पुणे: शिरूरमधील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच दरम्यान एक बिबट्या वनविभागाने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. परंतु, जेरबंद झालेला बिबट्या तोच नरभक्षक बिबट्या आहे, की दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पिंपरखेड येथे १३ वर्षीय रोहन बोंबेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. आक्रमक नागरिकांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून दिले, १५ ते १६ तास नागरिकांनी रास्ता रोको करत पुणे- नाशिक महामार्ग ठप्प केला होता. पोलिसांच्या मध्यस्तीने मार्गावरील वाहतूक पहाटे सुरळीत केली. तीन शार्प शूटरच्या टीम परिसरात आहेत. वेगवेगळ्या परिसरात बिबट्याचा शोध घेतला जात असून ज्या ठिकाणी रोहन ला बिबट्याने ठार केले तिथंच एक बिबट्या जेरबंद झाला आहे. तो नरभक्षक बिबट्या आहे का? की दुसरा बिबट्या आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. त्या बिबट्याला वनविभागाला गोळ्या घालून ठार करता येत नाही. या सर्व घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे. नागरिक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
