scorecardresearch

पुणे : गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, सबळ पुराव्यांअभाव्यी नऊ जणांची निर्दोष मुक्तता

पुण्यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली.

Court judgement
प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहा जणांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (५ मे) दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय सबळ पुराव्याअभावी नऊ जणांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. लोंढे याचा २८ मे २०१५ मध्ये उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रस्ता भागात गोळ्या घालून आणि शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.

आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४ रा. शिंदवणे, ता. हवेली), निलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा. डाळींब दत्तवाडी ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४ रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनील महाडिक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), विष्णू यशवंत जाधव (वय ३७,रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) आणि नागेश लखन झाडकर (वय २७, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

नितीन महादेव मोगल (वय २७ वर्ष), मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय ४५ मूळ रा. रामपूर जि. वारंगल, आंध्रप्रदेश), विकास प्रभाकर यादव (वय ३१ रा. उरुळी कांचन ता. हवेली), गोरख बबन कानकाटे (रा. कोरेगाव, इमानदारवस्ती ता. हवेली), आण्णा उर्फ बबड्या किसन गवारी (रा. मेमाणेवाडी ता. दौंड) प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन, सोमनाथ काळूराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड (तिघेही रा. उरुळी कांचन ता. हवेली), प्रवीण मारुती कुंजीर (रा. वळती ता. हवेली) यांची पुराव्याअभावी या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) २८ मे २०१५ रोजी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रस्त्यावर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडला होता. साडेपाचच्या सुमारास घरापासून काही अंतरावर रस्त्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या छातीत आणि पोटात शिरल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

कलम १२० ब (कट रचणे) आणि ३०२ (खून करणे ) या कलमांखाली आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोंदविलेले कबुली जबाब, बॅलेस्टिक तज्ज्ञ डॉ. कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. शाह यांनी केला. फिर्यादीतर्फे ॲड. सुहास कोल्हे यांनी काम पाहिले. गुन्हेगारांनी सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

अप्पा लोंढे कोण होता?

गुंड अप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेली या तालुक्यांसह पुणे जिल्ह्याच्या विविध परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यासारखे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली होती.

२००२ मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. अप्पा लोंढेच्या खून प्रकरणातून मुक्तता झालेला गोरख कानकाटे हा विलास लोंढे याच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life imprisonment to six accused in murder of criminal appa londhe case in pune print news pbs

ताज्या बातम्या