पुणे : दिल्लीकडे निघालेल्या महादजी शिंदे एक्सप्रेसमधून अभंगाचे सूर, स्वरचित कवितांचे तसेच हिंदी-मराठी गीतांचे गायन आणि तरुणाईचे रॅप अशा जल्लोषात मराठी साहित्ययात्री संमेलन रंगले होते. सरहद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी साहित्य संमेलनाला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांची उत्तम बडदास्त ठेवली.

‘चांगभलं रं’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतापासून गण, गवळण, अभंग, भक्तीगीते, भावगीते, लावणी, हिंदी चित्रपट गीते आणि अगदी मंगलाष्टकांपर्यंत विविध प्रकारांचे सादरीकरण करून या विशेष रेल्वेतील प्रवासी एकमेकांचे मनोरंजन करत आहेत. साहित्यिक आणि साहित्य रसिक या फिरत्या चाकांवरील संमेलनात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र आणि साहित्य या संदर्भात छोट्या मुलींनी प्रवाशांची प्रश्नमंजूषा घेतली. अचूक उत्तर देणाऱ्यास चॉकलेटचे बक्षीस देण्यात आले.

साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या सातारा येथील जयश्री माजगावकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची भावी पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने ही वेशभूषा साकारली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेत साहित्यिक आणि साहित्य रसिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत असल्याने दिल्लीपर्यंतचा प्रवास सुकर होत असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

महादजी शिंदे एक्स्प्रेसमध्ये नवोदित साहित्यिकांचा उत्साह आणि ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभवविश्व यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे. चारोळी ते कीर्तन आणि प्रेम, अभिजात ते संस्कृतीरक्षण असे विविध विषय हाताळणाऱ्या कविता सादर होत होत्या. १६ डब्यांच्या रेल्वेत प्रत्येक डब्यात छोट्या-मोठ्या समूहांद्वारे स्वतंत्र उपक्रम सुरू आहेत. अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, भार्गवी कुलकर्णी, डॉ. हनुमंत जाधवर, वसंतराव जाधवर यांनी स्वरचित कवितांची मैफल रंगविली. औदुंबर येथील जोशी कुटुंबांचे सदानंद साहित्य मंडळ प्रकाशन संस्थेत कार्यरत आहे. त्यातील चार-पाच भावंडांनी सहकुटुंब या संमेलनाच्या प्रवासात सहभाग घेत कथाकथन, कविता वाचनाचा जागर केला.

साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारणारे लोणी काळभोर येथील प्रसाद गवळी यांनी कुटुंबीयांसह संमेलनात सहभाग घेण्यासाठी रेल्वेने प्रवास करत आहेत. दिल्लीतील संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नृत्य सादरीकरणासाठी पुण्याच्या मराठी भाषा संवर्धन समूहाच्या १८ ते २२ वर्षे वयोगटातील ३० कलाकारांचा सहभाग असेल. नाशिकच्या ‘गोदावरी’ समूहाच्या पाचवी ते आठवीतील आठ मुली नृत्य सादरीकरणासाठी रेल्वेमध्येच हातांवर मेंदी काढण्यामध्ये गर्क होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरहद संस्थेचे वैभव वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रेल्वेतील प्रवाशांची बडदास्त ठेवण्यासाठी कार्यरत होते. वेळच्या वेळी न्याहरी आणि भोजनाची पाकिटे पोहोचविण्याचे काम करण्याबरोबरच कोणाला त्रास होत आहे त्यांना औषध देण्यासाठी कार्यकर्ते तत्पर होते. काही कार्यकर्त्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला.