Shaniwarwada Political Controversy : शनिवारवाड्यातील नमाज प्रकरणावरून येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ध्रुवीकरणाची काडी पडल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे शनिवारवाड्याजवळील दर्गा हा अडचणीत आणणाऱ्या राजकीय मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी कामी आल्याचे योगायोगही घडत असल्याचे दिसते आहे.
शनिवारवाड्यात काही महिलांनी नमाज पढल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी जागेचे शुद्धीकरण करण्यासाठी तेथे गोमूत्र शिंपले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शनिवारवाडा, नमाज आणि तेथे असलेला दर्गा या विषयांनी पुण्यातील इतर अनेक मुद्दे, सामाजिक राजकीय घटना बाजूला सारल्याचे दिसते आहे.
नमाजाच्या चित्रफितीनंतर परिसरातील दर्गा हटवण्याची मागणीही पुन्हा जोर धरू लागली आहे. शनिवारवाड्याजवळ शेकडो वर्षे असलेल्या धाकटा दर्गा आणि थोरला दर्गा दशकभरापासून वादाचा विषय झाला आहे. अधूनमधून वेगवेगळ्या निमित्ताने हे दर्गे हटवण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जाते आणि त्या दरम्यान पुण्यातील तत्कालिन सामाजिक, राजकीय विषयांवर असलेले नागरिकांचे आणि माध्यमांचे लक्ष काही काळासाठी दुसरीकडे वळते.
Shaniwar Wada : दर्गा जुना की नवा?
शनिवारवाड्याजवळ सुफी संत शेख सलाउद्दीन यांच्या नावाचे दर्गे आहेत. धाकटा दर्गा आणि थोरला दर्गा म्हणून ते ओळखले जातात. त्यातील धाकटा दर्गा हा शनिवारवाड्याला लागून आहे. शनिवारवाडा बांधला जाण्यापूर्वीपासून दोन्ही दर्गे अस्तित्वात आहेत असे मानले जाते. त्याच्या उरूसांवरून झालेल्या वादावर चिमाजी अप्पा पेशवे यांनी तोडगा काढला होता. नंतर थोरले माधवराव पेशवे यांनी दर्ग्यांसाठी देणग्या दिल्या होत्या. हा इतिहास मानणारा एक वर्ग आहे. त्याचवेळी दर्गा अनधिकृत असून साधारण तीस-चाळीस वर्षांपूर्वी तो बांधला गेला असा दावा करून दर्गे हटवण्यात यावेत अशी मागणी करणारे गट आहेत. थोडक्यात शनिवारवाड्याजवळील दर्गा हा काही अगदी नवखा विषय नाही.
Political Controversy :राजकीय योगायोग
पुण्यात सध्या शनिवारवाड्यातील नमाज आणि तेथील दर्गा हे विषय गाजत आहेत. त्याच्या भोवतालचे राजकीय योगायोग हे काहिसे रंजक म्हणावेत असे. नमाजाचा विषय गाजण्यापूर्वी काहीच दिवस पुण्यातील एका जैन संस्थेचा भूखंड विकासकाला दिल्याचे प्रकरण चर्चेत होते. त्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर अगदी काहीच दिवसांत पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचा परदेशी विद्यापीठातील प्रवेश शिक्षणसंस्थेच्या चुकीमुळे हुकल्याचे प्रकरण चर्चेत होते. विद्यार्थ्याने शिक्षणसंस्थेच्या संचालक निवेदिता एकबोटे यांच्यावर आरोप केले. एकबोटे कुटुंब हे पुण्यातील राजकारण, भाजप, हिंदू संघटना यांमध्ये सक्रीय. नमाज, शुद्धीकरण या विषय चर्चेत आल्यानंतर ही दोन्ही प्रकरणे चर्चेतून काहिशी बाजूला सरकली.
यापूर्वी २०२३ साली मार्चमध्ये शनिवारवाड्या नजिकचा दर्गा चर्चेत आला होता. त्यापूर्वी १६ नोव्हेंबर २०२२ मध्ये हाच दर्गा हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी मोर्चा काढला होता आणि तेव्हाही अनेक दिवस पुण्यात हा विषय गाजला होता. त्यापूर्वीच अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवण्यात आली होती हा आणखी एक योगायोग.
Maharashtra Local Body Polls : येऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी?
एकेकाळी पुण्यात असलेला कॉंग्रेसचा प्रभाव भाजपने कमी केला. दरम्यानच्या स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रसनेही आपला जम बसवण्यास सुरूवात केली. इतर पक्षांचे कमी जास्त प्रमाणात अस्तित्व असले तरी पुण्याची येती लढाई ही भाजप आणि राष्ट्रवादीमधील असणार आहे. पुण्यातील निवडणुकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुद्द्यांपेक्षा जातीय, धार्मिक मुद्द्यांवरच त्या अधिक गाजल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एखादा जातीय, धार्मिक ध्रुविकरण साधेल असा मुद्दा हटकून चर्चेत येतो. सध्या भाजपबरोबर राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) शनिवारवाड्यातील नमाजाच्या मुद्द्यावर उडी घेतली आहे. काहीच महिन्यांपूर्वी मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे यांनी शुद्धीकरण करण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्या कृतीवर टीका केली आहे. त्यामुळे येती निवडणूकही पुण्यातील प्रश्न, वाहतूक कोंडी, पसरणारी रोगराई, खड्डे यांपेक्षा धार्मिक किंवा जातीय मुद्द्यांवरच घसरण्याची शक्यता आहे.
