Pune Airport / पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे उड्डाण होताना विमानातील एका प्रवाशाने केलेले चित्रीकरण समाजमाध्यमांवर टाकल्याने भारतीय हवाई दलाने (आयएएफ) याचा तपास सुरू केला आहे. या चित्रीकरणात हवाई तळावर अनेक लढाऊ विमाने संरक्षित क्षेत्रात उभी केल्याचे दिसत आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांकडून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय हवाई दलाचे आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हवाई दलाच्या सर्व तळांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. विमान उड्डाणावेळी खिडकीतून बाहेरील परिसराचे चित्रीकरण करण्यास, छायाचित्रे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक संचालनालयानेही (डीजीसीए) प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
‘विमानतळावर उतरताना किंवा विमान आकाशात झेपावताना चित्रीकरण करून, छायाचित्रे काढून समाजमाध्यमांवर टाकल्यामुळे गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता असते. प्रवाशांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी कठोर कारवाई, निर्बंध आणि उपाययोजना आखण्याची गरज आहे,’ असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या संरक्षण धोरणांची आणि कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी बाळगायची गोपनीयता, सुरक्षितता याची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवाई तळासारख्या संवेदनशील ठिकाणी छायाचित्रे काढण्यावर किंवा चित्रीकरणावर कठोर निर्बंध आहेत. त्यातून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यावर शत्रू राष्ट्रांना संवेदनशील माहिती मिळण्याचा धोका संभवतो.
हवाई दलाच्या कार्यक्षमतेला धक्का बसू शकतो. विमानांचे स्थान, त्यांची संख्या आणि तळाची रचना यासारखी माहिती उघड होऊ शकते, जी सामरिकदृष्ट्या संवेदनशील असते.’
‘एकीकडे देशाच्या संरक्षण यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे अशा घटनांमुळे आव्हानेही निर्माण झाली आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी करणे गरजेेचे आहे. हवाई तळांवर ड्रोन आणि कॅमेऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, तसेच प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यावर अधिक कडक उपाययोजना केल्यास अशा गोष्टींना नक्कीच पायबंद होईल,’ असे मत हवाई वाहतूक विश्लेषक प्रिया देशमुख यांनी व्यक्त केले.
‘हवाई दलाकडून गंभीर दखल’
पुणे आंतरराष्ट्रीय ‘विमानतळावरून उड्डाण होत असताना हवाई तळावरील लढाऊ विमानांची चित्रफित ‘एक्स’ या मंचावर प्रसारित झाली. यावर काही वादग्रस्त प्रतिक्रियाही आहेत. हवाई दलाने या चित्रीकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे,’ असे हवाई दलातील सूत्रांनी सांगितले.