पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळय़ानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळय़ास राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधानपदी असताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करावा लागला होता. तर डॉ. मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्काराचे पूर्वीचे मानकरी
ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करून १९८३ मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली. गोदावरी परुळेकर, इंदिरा गांधी (मरणोत्तर), श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर), सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, पांडुरंगशास्त्री आठवले, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. विजय भटकर, राहुल बजाज, प्रा. एम. एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, रामोजी राव, एन. आर. नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा, जी. माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणब मुखर्जी, शीला दीक्षित, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे, डॉ. ई. श्रीधरन, डॉ. अविनाश चंदेर, सुबय्या अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचूक, डॉ. सायरस पूनावाला आणि डॉ. टेस्सी थॉमस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.