वाढती गुन्हेगारी, गुंड टोळ्यांकडून दहशत माजविण्याच्या घटना, टोळीयुद्धातून होणारे खून अशा घटनांमुळे पुणे शहर पुन्हा चर्चेत आले आहे. विद्येचे माहेरघर, आयटी सिटी अशी बिरुदे अभिमानाने मिरवणाऱ्या शहरात चालले तरी काय आहे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. गुंड टोळ्यांमधील धुसफूस आणि वर्चस्वाच्या वादातून सामान्य भरडले जात आहेत. रात्री-अपरात्री कोयते उगारून वाहनांची तोडफोड, प्रतिस्पर्धी टोळीतील सराइतांवर गोळीबार, खून अशा घटनांमुळे पुणे पुन्हा चर्चेत आहे. शहरातील गुन्हेगारी घटना आणि गुंड टोळ्यांची दहशत मोडण्यासाठी आता कडक पावले उचलण्याची गरज आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला गजबजलेल्या नाना पेठेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या प्रकरणातील आराेपी गणेश कोमकर याचा वीसवर्षीय मुलगा आयुष याच्यावर आंदेकर टोळीतील सराइतांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी आयुषवर एकापाठोपाठ १२ गोळ्या झाडल्या. आयुषवर तो राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आंदेकरने त्याचा मुलगा वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वत:च्या नातवाचा खून घडवून आणला.
टोळीयुद्ध, कौटुंबिक वादाची किनार या प्रकरणाला होती. मात्र, अवघ्या वीसवर्षीय आयुषचा काही संबंध नसताना टोळीयुद्धात बळी गेल्याने सामान्यांनी हळहळ व्यक्त केली. आंदेकर टोळीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली. गुन्हेगारीतून मिळवलेली त्याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. गणेश पेठेतील मासळी बाजाराच्या स्थलांतराचा प्रश्नही १३ वर्षांनंतर सुटला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक असले, तरी शहरातील गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नसल्याची घटना नुकतीच कोथरूडमध्ये घडली. कोथरूडमधील नीलेश घायवळ याच्या टोळीतील सराइतांनी १७ सप्टेंबरच्या रात्री एका तरुणावर गोळीबार केला. तसेच, काही अंतरावर थांबलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजविली. या घटनेमुळे कोथरूड भागात घबराट उडाली. कोथरूड भागात गेली काही वर्षे गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आाणि नीलेश घायवळ यांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध सुरू आहे. मारणे-घायवळ टोळीयुद्धातून आतापर्यंत चार जणांचा निर्घृण खून झाला. प्रतिस्पर्धी टोळीतील सराइतांवर जीवघेणे हल्ले झाले. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील गुंडांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. मकोका कारवाईनंतरही कोथरूडमधील गुंड टोळ्यांची दहशत कायम आहे. कोथरूडमध्ये तरुणावर झालेला गोळीबार टोळीयुद्धातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. घायवळ आणि मारणे टोळ्यांमधील वाद मिटविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याची चर्चा होती. त्यानंतर कोथरूडमध्ये शांतता निर्माण झाली होती.
कोथरूडमध्येच गेल्या फेब्रुवारीत श्री शिवजयंती मिरवणुकीत गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका संगणक अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी गजा मारणे टोळीतील गुंडांना अटक करण्यात आली. मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेलाही पोलिसांनी अटक केली. मारणे टोळीविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली. गुंड टोळ्यांमधील संघर्षाची झळ सामान्यांना बसण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. वर्चस्वाच्या वादातून नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करणे, रात्री-अपरात्री शिवीगाळ करून नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत. रस्त्यावरील वादही जीवघेणे ठरत आहेत. वाहन चालविताना गर्दीत वाद झाल्यानंतर थेट हाणामारीच्या, तसेच गंभीर दुखापत करण्याच्या घटना घडतात. या साऱ्या घटना विचारात घेतल्यास पुण्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुंडांच्या वर्तणुकीत सुधारणा होणार नसेल, तर कारवाईचा फायदा काय, अशा प्रश्न सामान्यांना पडला आहे. गुंडांना मिळणाऱ्या ‘राजाश्रया’वर पोलिसांनी योग्य ती कारवाई केल्यास काही अंशी पुण्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदतच होईल.
rahul.khaladkar@expressindia.com