दत्ता जाधव

पुणे : केवळ काढणी पश्चात नियोजन आणि व्यवस्थापन नसल्यामुळे देशात दर वर्षी सरासरी ३० लाख टन कांदा सडून, कुजून जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. खासगी क्षेत्रातील सूत्रांनी दिलेली माहिती आणखी धक्कादायक आहे. त्यांच्या माहितीनुसार दरवर्षी सुमारे ६० लाख टन कांदा सडतो आहे. या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल होत आहेच, शिवाय देशाची अन्न सुरक्षा धोक्यात येते आहे.

राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजू काळे म्हणाले,‘खरीप आणि उशिराचा खरीप कांदा जास्त दिवस टिकत नाही. या कांद्यात पाण्याचे प्रमाण खूप असते. देशात साधारण ६० ते ७० लाख टन कांदा साठवण करण्याची क्षमता आहे. कांदा चाळीमध्ये जास्त कांदा असतो. मात्र चाळींमधील कांदा उन्हामुळे, पावसामुळे, वादळी वाऱ्यामुळे, आद्र्रतायुक्त थंडीमुळे खराब होतो. कांद्याला कोंब येतात, कांदा सडतो, कांद्याचे वजन कमी होते. चाळीतील सरासरी ३० ते ४० टक्के कांद्याचे नुकसान होते. प्रतिकूल हवामानात हे नुकसान ६० टक्क्यांहून अधिक होते. देशात दरवर्षी सरासरी ३० लाख टन कांद्याचे विविध कारणांमुळे नुकसान होते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक येथील ‘गोदाम इनोव्हेशन’या कंपनीच्या प्रमुख, कांदा अभ्यासक कल्याणी िशदे म्हणाल्या,‘दरवर्षी देशात जवळपास ६० टक्के कांद्याचे कुजून, सडून, कोंब येऊन आणि वजन घटून नुकसान होते. पारंपरिक कांदा चाळीत तापमान आणि  आद्र्रता नियंत्रित करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना कांदा कुजून वास येईपर्यंत कांद्याचे नुकसान झाल्याचे कळत नाही. चाळीत ठेवलेल्या कांद्याचा वास आला म्हणजे जवळपास २५ टक्के कांदा सडलेला असतो. शीतगृहात कांदा साठवणूक करणे आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे नाही. शिवाय शेतकरी ते ग्राहक, अशी कांद्याची शीत साखळी तयार करणेही आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कांद्याचे नुकसान टाळणे नजीकच्या काळात तरी शक्य नाही.’

असे आहे कांद्याचे गणित

दरवर्षी सरासरी २५० लाख टन कांदा उत्पादन होते. दरवर्षी सुमारे १५० लाख टन कांद्याची देशाअंतर्गत गरज असते. सुमारे २५ लाख टनांची निर्यात होते. प्रक्रिया उद्योगासाठी काही प्रमाणात कांद्याचा वापर होतो. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा सरासरी २० टक्के आहे.