पुणे : राज्यात १६ जुलैअखेर सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सांगलीत १६ जुलैअखेर सरासरी १८२.४ मिमी पाऊस पडतो, यंदा केवळ ५२.६ मिमी पाऊस झाला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कमी पावसाची म्हणजे अवघा ७६.४ मिमी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने रविवारी मोसमी पावसाने राज्यात सरासरी गाठल्याची माहिती दिली होती. पण, अपवादवगळता बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. सांगलीत सर्वांत कमी ५२.६ मिमीची नोंद झाली आहे. हिंगोलीत १६ जुलैअखेर सरासरी २८४.१ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात ७६.४ मिमी पाऊस झाला आहे. सांगलीत ७१ टक्के, तर हिंगोलीत ७३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी’ची पिंपरी-चिंचवड शहरासाठी कार्यकारी समिती

राज्यातील एकूण सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यात लातूर, ठाणे, गोंदिया, नंदूरबार, मुंबई उपशहर, भंडारा आणि पालघरचा समावेश आहे. पालघरमध्ये सरासरी ८६७ पाऊस पडतो, प्रत्यक्षात १०९६.३ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा २६ टक्क्यांनी जास्त आहे.

देशातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

देशात एकूण १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. कर्नाटकातील कोडगू, छत्तीसगडमधील सरगुजा, ओदिशातील कालाहंडी. झारखंडमधील चतरा, धनाबाद, जमतारा आणि गिरिडीह. बिहारमधील पूर्व चंपारण्य, सीतामढी आणि शिवहर. मणिपूरमधील चुराचांदपूर आणि चंदेल. अरुणाचल प्रदेशातील कुरुंग कुमे आणि दिबांग खारे या १४ जिल्ह्यांत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

हेही वाचा – खाद्यतेल उद्योगासमोर सरकीच्या टंचाईचे सावट, जाणून घ्या काय होतील परिणाम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरुणाचलच्या दिबांग खोऱ्यात सरासरी ६०४.४ मिमी पाऊस पडतो. पण, तिथे अद्याप पाऊस पडलेला नाही. देशाचा विचार करता अरुणाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांनंतर सर्वांत कमी पाऊस सांगलीत झाला आहे.