जेजुरी : ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्याची पुनर्बांधणी व संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पुरातत्त्व खाते आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.’ असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगतिले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले पुरंदर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले,‘ छत्रपती संभाजी महाराज हे प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. बालपणात छत्रपती श्री शिवाजी महाराजांबरोबर अनेक लढाया मोहिमांमध्ये ते सहभागी झाल्याने पराक्रमाचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यांनी रयतेवर प्रेम केले, त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करीत आहे.’ पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पुरंदर किल्ला हे जन्मस्थळ असल्याने या परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. शासनाने जेजुरीच्या ऐतिहासिक खंडोबा गडाचा विकास आराखडा केला आहे. त्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी केली.

रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

‘छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात राज्य शासनाच्या वतीने जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.’ अशी घोषणा उद्योगमत्री सामंत यांनी केली ‘छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट दीड महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला. सर्वांना तो खूप आवडला. तसेच आता रत्नागिरीतील कसबा येथे सर्वांना अभिमान वाटेल, असे भव्य स्मारक उभारण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा येथे पाहायला मिळेल.’ असेही सामंत म्हणाले.