‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था’ बळकट करण्यासाठी ‘एकात्मिक वाहतूक आराखडा’ (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) तयार करण्यात आला आहे. सुनियोजित पद्धतीने आराखड्याची अंमलबजावणी करणे आणि त्यात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढविणे एवढाच भविष्याच्या दृष्टीने पर्याय आहे. याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी विनय पुराणिक यांनी साधलेला संवाद.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचे योगदान कसे वाढणार?

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा ‘जीवनदायिनी’ म्हणून सेवा बजावत आहे. त्याच धर्तीवर कमी वेळेत सुलभ प्रवासासासाठी महामेट्रोकडून ६६.२७ किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे, ज्यातील ३२.९७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकांवर मेट्रो धावण्यासही सुरुवात झाली आहे. प्रवाशांनी या नवीन सेवेचा उत्साहाने स्वीकार केला आहे. मात्र, मेट्रोचा जास्तीत जास्त वापर व्हावा, विस्तार व्हावा, सुलभ सेवा मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यातील मार्गिकांची कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज हा ५.४६ किलोमीटर लांबीचा भुयारी मेट्रो मार्गिका प्रकल्प आणि पीसीएमसी ते भक्ती-शक्ती मार्गिका प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गिकांच्या विस्तारामुळे शहरे-उपनगरे जवळजवळ येत असून, पूर्वेकडे तळेगाव, शिक्रापूर, उंड्री, पिसोळी, उरुळी, फुरसुंगी आणि इतर ठिकाणी मिळून नवीन ७० किलोमीटरपर्यंतची मार्गिका वाढविण्याचा मानस आहे. पश्चिम आणि उत्तरेकडच्या भागात मेट्रोचे जाळे विस्तारल्याने पुण्यातून पिंपरी भागात जाण्यासाठी सुलभ सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील स्थलांतरदेखील वाढले आहे. खासगी वाहनांमध्ये दिवसेंदिवस वाढ, अरुंद रस्ते, अतिक्रमण यांमुळे वाहतूक कोंडीत वाढ होते आहे. याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान, उद्याोग-व्यवसाय, व्यापार, शिक्षण, रोजगार आदी क्षेत्रांवर होत असल्याने एकत्रित सर्वंकष गतिशील आराखडा (मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यात आला आहे.

मेट्रो स्थानकांबाहेर वाहनतळाच्या धोरणाची अंमलबजावणी कधी?

सुलभ प्रवासी सेवा देणे एवढीच मेट्रोची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे स्थानकांबाहेर वाहनतळ ही गरज नसून, भविष्यात कोणत्याही स्थानकाबाहेर स्वतंत्र वाहनतळ सुविधा सुरू करण्यात येणार नाही. वाहनतळ केल्यास भूसंपादन, आर्थिक खर्च, देखभाल-दुरुस्ती, सुरक्षा आदींचे नियोजन वाढतेच. परंतु, स्थानकापर्यंत येण्यासाठी नागरिक खासगी वाहन रस्त्यावर आणणार. त्यामुळे पुन्हा वाहतूककोंडीला आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पाश्चात्त्य देशांत मेट्रो स्थानकांच्या परिसरात विविध समस्यांमुळे वाहनतळ उखडून टाकले आहेत.

पूर्ण शहरात मेट्रो कशी पोहोचणार?

शहराची मध्यवर्ती ठिकाणे असलेल्या स्वारगेट, शिवाजीनगरपासून कोथरूड, रामवाडी, पिंपरी अशा वेगवेगळ्या दिशांनी मेट्रो धावत आहे. यांपैकी ज्या मार्गांवरून मेट्रो जाणेच शक्य नाही किंवा जवळून मेट्रोचा मार्ग जात आहे, अशा ठिकाणच्या प्रवाशांसाठी ई-बाइक, स्थानकापासून इच्छितस्थळी पोहोचण्यापर्यंत बससुविधेचे नियोजन करण्यात आले आहे. ही पूरक (फीडर) सेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांची मागणी, उपलब्ध रस्ते, सार्वजनिक वाहतूक सुविधेचे पर्याय, तसेच भौगोलिक आणि व्यावसायिक परिस्थिती असा विश्लेषणात्मक आणि सूक्ष्म अभ्यास करण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी पूरक (फीडर) सुविधा उभारण्यात येणार आहे.

महामेट्रोची स्वतंत्र बस सुविधा कधी सुरू होणार?

मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा स्थानकावरून इच्छितस्थळी सहज प्रवास करण्याची सार्वजनिक सेवा प्रदान केली, तरच वाहतूककोंडीतून मुक्तता होईल. रस्त्यावरील खासगी वाहनांच्या संख्येत आपसूकच घट होईल. त्यासाठी महामेट्रोने स्थानकापासून इच्छितस्थळी जाण्यासाठीच्या ठिकाणांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या ठिकाणी मागणी आहे, सुविधा सुरू केल्यास प्रभाव पडू शकतो, त्याचा खर्च आणि सुविधेसाठी निधीच्या अनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सुरू केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, साधारणत: एक हजार बसची आवश्यकता आहे. या बस स्वत: खरेदी करून सेवा प्रदान करायची, की पीएमपीकडून घ्यायच्या, याबाबत निर्णय होईल. स्वत: बस घेतल्या, तरी सुविधा पीएमपीच पोहोचविणार असल्याने पीएमपीच्या समन्वयाने कार्यवाही केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vinay.puranik@expressindia. com