पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करूनही राज्यभरात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ४२ गैरमार्ग प्रकरणांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक २६ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात नोंदवली गेली आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या दिवशीच्या गैरमार्ग प्रकरणांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात २७१ भरारी पथकांसह बैठी पथके, राज्यभरातील ८१८ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली, संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे आणि गैरप्रकार करणारे यांच्यावर अदखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी इंग्रजी विषयाने बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिल्याच दिवशी राज्यभरात नऊ विभागांमध्ये मिळून ४२ गैरमार्ग प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यात पुणे विभागात ८, छत्रपती संभाजीनगर विभागात २६, नागपूर आणि अमरावती विभागात प्रत्येकी दोन, लातूर विभागात एक, तर नाशिक विभागात तीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार गैरप्रकार घडणाऱ्या परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे. नोंदवल्या गेलेल्या ४२ गैरमार्ग प्रकरणांपैकी जी प्रकरणे भरारी पथकांनी पकडली आहेत, त्या संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षी रद्द करण्यात येईल. परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नयेत, आता कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.