पुणे : शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदा शैक्षणिक वर्षात वह्यांची कोरी पाने जोडलेली चार भागातील एकात्मिक पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. या एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी बालभारतीने ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्च केला आहे. अखर्चित असलेल्या आणि बचत झालेल्या निधीच्या वर्गीकरणातून बालभारतीला या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. यंदा पथदर्शी स्वरुपात राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्यांची कोरी पाने जोडलेली चार भागातील एकात्मिक पाठ्यपुस्तके देण्यात आली. बालभारतीने या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.

हेही वाचा…आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी कधीपासून? शिक्षण विभागाने दिली माहिती…

त्यानंतर आता बालभारतीने केलेल्या ७१ कोटी ४० लाख २६ हजार रुपये खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी असलेल्या निधीतील अखर्चित असलेल्या १५ कोटी ४५ लाख ७ हजार २३० रुपयांचा निधी वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय शिक्षण विभागाकडे २०२३-२४ अखेर असलेल्या बचतीमधून ५५ कोटी ९५ लाख १९ हजार रुपयांचा निधी बालभारतीला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.