पुणे : राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेतील संभ्रम शालेय शिक्षण विभागाने दूर केला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ आणि २४ वर्षांनंतर लागू केल्या जाणाऱ्या वेतनश्रेणीबाबतची स्पष्टता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यानुसार शिपाई ते वरिष्ठ लिपिक या पदांना लागू होणारी श्रेणी, वेतनवाढ निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपासून दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली. मात्र, या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना १२ आणि २४ वर्षांनी कोणती वेतनश्रेणी लागू करावी याबाबत स्पष्टता नव्हती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला.

आता शिपाई पदासाठी एस ३, एस ४, नाईक पदासाठी एस ४, एस ५, प्रयोगशाळा परिचर पदासाठी एस ६, एस ७, कनिष्ठ लिपिक पदासाठी एस ८, एस १३, प्रयोगशाळा सहायक पदासाठी एस ८, एस ९, वरिष्ठ लिपिक पदासाठी एस १३, एस १४, मुख्य लिपिक पदासाठी एस १४, एस १५, ग्रंथपाल पदासाठी (मॅट्रिक आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम) एस ९, एस १०, ग्रंथपाल पदासाठी (पदवीधर आणि ग्रंथालयशास्त्रातील पदवी किंवा पदविका) एस ११, एस १२, तर अधीक्षक पदासाठी एस १५ वेतनश्रेणी लागू करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या शासननिर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर म्हणाले, की राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४ रोजी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली. मात्र, त्या शासन निर्णयात कर्मचाऱ्यांना १२ वर्षांनंतर, २४ वर्षांनंतर कोणती वेतनश्रेणी लागू करावी, याबाबतचा उल्लेख नसल्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी वेतनश्रेणी निश्चित होत होती. पडताळणीमध्येही एकसूत्रता नव्हती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नव्या शासन निर्णयाने १२ आणि २४ वर्षांनंतर कोणती वेतनश्रेणी द्यायची याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात समान वेतननिश्चिती होईल. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २४ वर्षांनंतर एस ३ या श्रेणीतून एस ५ ही वेतनश्रेणी निश्चित होणे अपेक्षित असताना नव्या निर्णयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एस ३ श्रेणीतून एस ४ वेतनश्रेणी करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होणार आहे, याकडेही खांडेकर यांनी लक्ष वेधले.

मूळ मागणीपासून वंचित

सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार १०, २०, ३० वर्षांनंतरचा लाभ मिळावा, ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मूळ मागणी आहे. मात्र, ती योजना लागू करण्यापासून अद्यापही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे, असेही खांडेकर यांनी नमूद केले.