पुणे : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील. किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, बंगालच्या खाडीत तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड, मध्य प्रदेशवरून राजस्थानकडे पुढे गेले आहे. त्यामुळे विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच पुढील तीन - चार दिवस या भागात पावसाचा फारसा जोर राहणार नाही. तरीही तुरळक ठिकाणी अधून - मधून हलक्या सरी पडतील. हेही वाचा : पिंपरी: नदीकाठच्या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही गुजरात किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. पण, तो अद्याप काही प्रमाणात सक्रिय असल्यामुळे किनारपट्टी, घाटमाथ्यावर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहील. पण, हलक्या सरींची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रात मोसमी पाऊस काहीशी उघडीप घेण्याचा अंदाज आहे. हेही वाचा : सेट परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर; किती उमेदवार ठरले पात्र? मंगळवारसाठी इशारा पिवळा इशारा - रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि विदर्भ.