पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, हा अनमोल ठेवा आता साहित्य रसिकांसाठी महाजालावर उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या sahityaparishad.org या संकेतस्थळावर अंक पाहण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे. त्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे वाङ्मयीन नियतकालिक संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे. १९१३ मध्ये पत्रिकेचा पहिला अंक ‘विविधज्ञानविस्तार’ ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला होता. मात्र, १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यतः साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा आणि संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील लेखन वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. परिषदेने गेल्या शंभर वर्षातील निवडक लेखांचे संकलन असलेला आणि डॉ. नीलिमा गुंडी यांनी संपादित केलेला ‘अक्षरधन’ हा एक हजार पृष्ठांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. आता महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यामुळे सर्व अंक वाचक, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी उपलब्ध झाले आहेत.’
राज्य मराठी विकास संस्था ही महाराष्ट्र शासनाद्वारे मराठीच्या विविधांगी विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था असून, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अनुसार संस्थेद्वारे दुर्मीळ ग्रंथांचे आणि नियतकालिकांचे संगणकीकरण करून ते महाजालावरून उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत असतो. आतापर्यंत अनेक ग्रंथांच्या तसेच नियतकालिकांच्या उपलब्ध झालेल्या अंकांचे संगणकीकरण करण्यात आले असून, ते संस्थेच्या संकेतस्थळावरून सर्वांना अभ्यासासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चे वाङ्मयीन महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेला या संदर्भात राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परिषदेने त्यास मान्यता दिली आणि हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. – डाॅ. शामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था