पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदासाठीच्या परीक्षेत पुन्हा एकदा विघ्न निर्माण झाले आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ५ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला असून, आता ही परीक्षा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आयोजित केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांच्या (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदांसाठी राज्य परीक्षा परिषदेने ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेेने १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. परीक्षा परिषदेने २०२३ मध्येही केंद्रप्रमुख पदासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. त्यावेळीही शिक्षक उमेदवारांनी अर्ज भरून नोंदणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यावेळीही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे एकच परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र प्रमुख पदासाठी १ ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव परीक्षेचे आयोजन जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करण्याचे नियोजित असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली मुदत १ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही १ जानेवारी २०२६ रोजीची अंतिम समजण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणुकीमुळेही अडचण
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. केंद्रस्तरीय अधिकारी ते मतदानाच्या दिवशीही शिक्षकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे २ डिसेंबर रोजी परीक्षा झाल्यास परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना परीक्षा देणे किंवा निवडणुकीचे कामकाज करणे शक्य होणार नसल्याची बाब काही शिक्षकांनी निदर्शनास आणून दिली.
टीईटी परीक्षेशी संबंधित कामे, निवडणूक, तसेच परीक्षा परिषदेतील काही तांत्रिक अडचणींमुळे केंद्रप्रमुख पदासाठीची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद
