पुणे : राज्यातील तीन शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी, शिक्षकदिनी दिल्लीमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केली. त्यानुसार, देशभरातील ४५ शिक्षकांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. मुंबईतील ॲटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलमधील सोनिया कपूर, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन, लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
‘गेली २३ वर्षे अकरावी-बारावीला संगीत विषयाचे अध्यापन करत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन दिल्याने २७ विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात करिअर करत आहेत. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार केल्या जात असलेल्या नव्या अभ्यासक्रम निर्मितीमध्येही योगदान दिले आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना संगीत, नृत्य, दृश्यकला, नाटक शिकवले जाणार आहे. गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांचे महत्त्व वाढल्याने शिक्षणातील कला विषयांचे महत्त्व कमी झाले. मात्र, आता येत्या काळात चित्र बदलू शकते. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे,’ असे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, डॉ. जगदाळे यांनी बारावीतील अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतून पुस्तके तयार केली आहेत.
डॉ. शेख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. ‘विशिष्ट समाजाच्या मुली सातवीनंतर शाळेत येत नव्हत्या. पालकांशी संवाद साधल्यावर शाळा दूर असल्याचे कारण पुढे आले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांशी चर्चा करून मुलींच्या वस्तीमध्ये चार खोल्या भाड्याने घेऊन वर्ग सुरू करण्यात आले. त्यामुळे २०१६ पासून आतापर्यंत दोन हजार मुली दहावी उत्तीर्ण झाल्या. परिणामी, बालविवाहाचे प्रमाण कमी झाले. त्याशिवाय मुली आणि महिलांसाठी पाच लाखांहून अधिक सॅनिटरी पॅड्स त्यांनी उपलब्ध करून दिले. शाळेची पटसंख्या आजही टिकून आहे. दहा वर्षांत पहिल्यांदा मराठवाड्यातील शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आई-वडीलही शिक्षक होते. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद शब्दांत सांगता येत नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.