पुणे : शहरासह जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शिधा दुकानदारांचे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे मार्जिन (लाभ रक्कम) राज्य शासनाने दिलेले नाही. मात्र, अर्थ विभागातून कमिशनसाठीचा निधी अन्नधान्य पुरवठा विभागाला उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा न झाल्याने शिधा दुकानदारांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांना देय असलेले प्रलंबित दिवाळीपूर्वी अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दिवाळीपूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील शिधा दुकानदारांना मार्जिन मिळावे, अशी सूचना राज्य शासनाने केली आहे. मात्र, अद्याप कमिशन मिळाले नसल्याचे शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी तक्रारी केल्या आहेत.
शहरात ७५५, तर जिल्ह्यात १ हजार ८५९ असे सुमारे अडीच हजार शिधा दुकानदार आहेत. पुणे शहर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे कमिशन रखडले आहे. २५ ऑगस्टपूर्वी प्रतिक्विंटल १५० रुपये असे कमिशन आकारण्यात आले आहे. मात्र, कमिशनवाढीच्या मागणीनंतर प्रतिक्विंटल १७० रुपये दर हा २५ ऑगस्टनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५० रुपये प्रति क्विंटलनुसार, जून ते ऑगस्टदरम्यानचे कमिशन दिले जाणार आहे.
‘राज्य सरकारकडे कमिशन मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून दिवाळीपूर्वी मार्जिन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच अर्थ विभागाने कमिशनसाठीची रक्कम पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही,’ असे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शिधा दुकानदारांच्या खात्यात कमिशनची रक्कम जमा होईल. सुमारे एक कोटी ८० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल, असे शहर अन्न वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी सांगितले.
पावणेदोन कोटींची रक्कम जमा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार तीन महिन्यांच्या कमिशनची रक्कम ऑनलाइन स्वरुपात दोन ते तीन दिवसांत ती जमा होईल. महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी