लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मतदारसंघात पदयात्रा, दुचाकी रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि पत्रकार परिषदा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रचाराची सांगता केली. प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी सहावाजेपर्यंत परवानगी असल्याने सकाळपासूनच शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे महत्वाचे नेते शहरात नसल्याचा फायदा घेत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी दुचाकी रॅली काढली. तर आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आणि हरियाणाच्या आमदार विनेश फोगाट यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपच्या कारभारावर टीका केली. महिला आणि महिला खेळाडूंना न्याय मिळावा, यासाठी राजकारणात प्रवेश केल्याचा आमदार फोगाट यांनी सांगितले.

आणखी वाचा-प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीीची समाज माध्यमात बदनामी, कोथरुड पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मतदारसंघात दुचाकी, चारचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता केली. जागोजागी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. जगताप यांची रॅली आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले जात होते. यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वसंत मोरे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. कोथरुड मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत मोकाटे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली. मेट्रो चांदणी चौकापर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचे मोकाटे म्हणाले. पर्वती मतदारसंघाच्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी ज्येष्ठ कामदार नेते डॉ. बाबा आढाव यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघात पदयात्रा काढून मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला.