पुणे : महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात आयुक्त आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्ष मनसेच्या समर्थनार्थ मैदानात उतरला. मनसेसोबत महाविकास आघाडीने महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यामुळे पुण्यात आगामी काळात मनसे ही महाविकास आघाडीत सहभागी होऊन नवीन राजकीय समीकरण जुळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करत शिवसेना आणि मनसे यांच्यात दिलजमाई होणार असल्याचे बोलले जाते. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक असल्याची भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनात मनसेबरोबर महाविकास आघाडी सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हे बुधवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेले होते. त्या वेळी आयुक्त बैठकीत असल्याने शिंदे यांनी थेट त्यांच्या बैठकीत प्रवेश केला. त्यावरून महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शिंदे यांच्यात वादावादी झाली. शिंदे अंगावर धावून आल्याने आयुक्त रामदेखील संतापले. त्यातच आयुक्तांनी ‘बाहेर जा’ असे हिंदीमध्ये सांगितल्याने या प्रकरणाला वेगळाच रंग आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली. त्यानंतर तोडगा न निघाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणानंतर महाविकास आघाडीने मनसेच्या समर्थनार्थ मैदानात उतरत महापालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्तांच्या विरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने आता मनसेचे ‘इंजिन’ महाविकास आघाडीला जोडले जाणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.