लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) दिघी येथील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेच्या संचालक पदाचा पदभार डॉ. मकरंद जोशी यांनी गुरुवारी स्वीकारला.  आर अँड डीईचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असून या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांना अटक केली आहे. त्यानंतर संचालकपदाची जागा अद्याप रिक्त होती. मात्र आता डॉ. जोशी संचालक म्हणून नियुक्त झाले आहेत.

हेही वाचा… बँड लावून वाजतगाजत ‘लाडक्या राणी’चा प्रवाशांकडून वाढदिवस साजरा

डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएच. डी. प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट २००० मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

हेही वाचा… प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते मिरज आता नवीन विशेष गाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आर अँड डीई’ची स्थापना सहा दशकांपूर्वी करण्यात आली असून ही एक प्रमुख अभियांत्रिकी प्रयोगशाळा आहे. याद्वारे भारतीय सशस्त्र दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींच्या स्वदेशी विकासावर भर देण्यात येत आहे. या प्रयोगशाळेद्वारे लष्करासाठी लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्रिजिंग सिस्टीम, विस्फोटक प्रणाली, लाँचर्स आणि ग्राउंड सपोर्ट सिस्टिम यांचा समावेश आहे. संमिश्र उत्पादने, रोबोटिक प्रणाली आणि मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल-सिस्टम्स (एमईएमएस) विकसित करण्याच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा अग्रगण्य आहे.