लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने घरात शिरुन बाऊन्सरने एकाला मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली.

आकाश पुरुषोत्तम सापा (वय ३२, रा. भवानी पेठ), ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेचा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वानवडीतील शांतीनगर भागात राहायला आहेत.

तक्रारदार हे स्वत: बँकेतील कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मध्यस्थी करतात. त्यासाठी त्यांना कर्जदार, तसेच बँकेकडून काही मोबदलाही मिळतो. तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कमेतून विम्यापोटी ४३ हजारांची रक्कम कापून घेण्यात आली. कर्ज मंजूरी प्रक्रिया शुल्क कापून घेण्यात आले. त्यांच्या खात्यात सहा लाख ८५ हजार रुपये जमा करण्यात आले. दरमहा १८ हजार ७० रुपये हप्ता ठरविण्यात आला. त्यानंतर त्यांनी नियमतपणे २४ हप्ते भरले. दरम्यान, त्यांच्या १७ वर्षीय भाच्याचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांनी काही आर्थिक मदत बहिणीला केली.

ओैषधोपचारासाठी पैसे दिल्याने त्यांचा एक महिन्याचा हप्ता थकला. २ मार्च रोजी त्यांनी हप्ता भरला नाही. त्यानंतर २५ मार्च रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. हप्ता थकल्याने त्यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यात आले. त्यानंतर ते २६ मार्च रोजी स्वत: शिवाजीनगर भागातील वाकडेवाडीत असलेल्या वित्तीय संस्थेच्याकार्यालयात गेले. हप्ता का थकला, याबाबतचे कारणही त्यांनी दिले. गुरुवारी (२७ मार्च) सायंकाळी तक्रारदार आणि त्यांचा भाऊ घरात होता. त्या वेळी दोघे जण त्यांच्या घरीत आले. आम्ही खासगी वित्तीय संस्थेतून आल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी तक्रारदाराने त्यांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. थकलेल्या हप्त्याची रक्कम घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगून दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाला मारहाण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर तक्रारदाराने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी चौकशी केली. तेव्हा मारहाण करणाऱ्या बाऊन्सरने खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाच्या सांगण्यावरुन आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली असून, व्यवस्थापक जिमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली. सहायक फौजदार साबळे तपास करत आहेत.