पुणे : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. आर. डोरनालपल्ले यांच्या न्यायालयात हजर राहिले. त्यांनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करून हे प्रकरण निकाली काढावे, असा अर्ज केला आहे. या अर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला. या अर्जावर १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जि. जालना) यांच्याविरोधात फसवणूक, तसेच अपहार केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी जरांगे पाटील यांनी अर्ज केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही सुनावण्यांना ते उपस्थित नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ते शुक्रवारी उपस्थित राहिले.

जरांगे-पाटील शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोरनालपल्ले यांच्या न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली. ‘या प्रकरणात जरांगे-पाटील यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. फसवणूक करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. नाटकाच्या प्रयोगाची नोंदणी करण्यापूर्वीच त्यांनी आगाऊ पाच लाख रुपये दिले होते. नाटकाबाबत झालेल्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही. आरोप निश्चिती करण्यास पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांना गुन्ह्यातून वगळावे’, असा युक्तिवाद ॲड. निंबाळकर यांनी केला.

या अर्जावर पुढील सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी ॲड. निंबाळकर हे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर सरकारी वकील ॲड. डी. सी. खोपडे, फिर्यादीकडून ॲड. खंडेराव टाचले, ॲड. आकाश बिराजदार यांचा युक्तिवाद होणार आहे.