पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे. राज्यभरात दौरे सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज बांधवांची काय भूमिका काय असणार याबाबत मनोज जरांगे पाटील हे बैठका घेत आहे. त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पुणे शहर आणि जिल्ह्यातील समाज बांधवा समवेत मनोज जरांगे पाटील यांनी रात्री बैठक घेतली. त्यामध्ये अनेक मुद्यांवर चर्चा देखील झाली.

त्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व मराठा बांधवाची लवकरच अंतरवली सराटी येथे बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीकरीता राज्यभरामधून जवळपास २० ते २२ लाख समाज बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लढायच की पडायचं, हे ठरवलं जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड गजाआड; आंदेकर यांची बहीण आणि भाचाही अटकेत

राज्यभरात तुम्ही दौरे करीत आहात, उपोषण केलं पाहिजे की विधानसभा निवडणुक लढवली पाहिजे. नेमकी कार्यकर्त्यांची भावना काय आहेत. त्यावर ते म्हणाले की, समाजाची कोणत्याही बाबतीत तयारी आहे. मी त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे उपोषणाला विरोध केला जातो. ते विरोध करतात पण मी काहीही चुकीच करीत नाही. समाजातील मुलांच्या कल्याणासाठी लढा देत आहे. या मागील हीच भावना असल्याच त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता राज्य सरकारला वेळ दिला जाणार आहे का त्या प्रश्नावर ते म्हणाले की, वर्षभर वेळ दिला आहे. आता आणखी किती वेळ द्यायचा, आता ते राहणारच नाही. तर त्यांना वेळ का द्यायचा, ते सरकार राहणारच नाही. किती वेळ हे सरकार ठेवणार, गोरगरीब ओबीसींचे हाल होत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे हाल आहेत. त्यामुळे हे सरकार नेमक काय करीत आहे. असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मराठा समाज आहे. या समाजाला अनेक वर्षांपासून वेठीस धरण्याच काम केलं गेलं आहे. त्यामुळे आता किती दिवस सहन करायचे, आता लोक स्वतःच्या मुलांच्या बाजूने उभे राहणार आणि यांना दणादण पाडून टाकणार, आता यांना सोडणार नसल्याच सांगत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.