लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी दिवाळीनंतर प्रसिद्ध केली जाणार असून, महिनाअखेरीस ३६८ उमेदवारांना विविध पदांवर रुजू करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचे मनुष्यबळ वाढणार आहे.

महापालिकेच्या वेगवेगळ्या १५ पदांच्या ३६८ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर ११ पदांसाठीच्या ३५ जागांचा निकाल सात ऑगस्टला जाहीर झाला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपीक, ॲनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदांचा समावेश होता. लिपीक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी ३० हजार ५८१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल ३० ऑगस्टला जाहीर करण्यात आला.

आणखी वाचा-पुनावळेतील प्रस्तावित कचरा भूमीला गृहनिर्माण संस्थांचा विरोध; महापालिकेला नोटीस, दिला ‘हा’ इशारा

आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सादर केलेली प्रमाणपत्रे शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे आहेत की नाही हे तपासणे सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीची मंजुरी घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर विविध पदांसाठी ३६८ जणांना महापालिकेत रुजू करून घेतले जाईल. ही प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. -विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका