आजपासून अनेक निर्बंध शिथिल, शहरवासीयांना दिलासा
पिंपरी : पुणे शहराबरोबरच पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक निर्बंध सोमवारपासून (७ जून) शिथिल करण्यात आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. सर्व प्रकारची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. उपाहारगृहे, बार, फूडकोर्ट सोमवार ते शुक्रवापर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहणार असून व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चारवाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाच जणांपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असून पाचनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. शहरातील सर्व अत्यावश्यक सेवांमध्ये नमूद केलेल्या सेवा, दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, खुली मैदाने सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत खुली राहतील. या कालावधीत व्यायामासाठी चालणे व सायकल चालवण्याची मुभा राहील. मॉल, सिनेमाघर, नाटय़गृह बंदच राहतील. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच राहील. पीएमपी बस अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. मालवाहतूक करणाऱ्यांना तीन व्यक्तींसह प्रवास करण्याची मुभा असेल. आंतरजिल्हा प्रवासास सशर्त परवानगी राहील. खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत काम सुरू ठेवता येईल. अत्यावश्यक सेवा आणि कोविडशी संबंधित शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. निवासाची व्यवस्था असल्यास चित्रीकरणास परवानगी असेल. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असल्यास बांधकामांना परवानगी असेल. ५० जणांच्या उपस्थितीत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील. लग्नसमारंभासाठी ५० जणांची तर अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी २० जणांच्या उपस्थितीची परवानगी राहील. बैठका, सभा, निवडणुका ५० जणांच्या उपस्थितीत घेता येईल. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग ३० जूनपर्यंत बंदच राहतील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पालकांसोबत संचारबंदी काळातही प्रवास करण्याची मुभा असेल. कृषी संबंधित सर्व दुकाने आठवडाभर दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यास सुधारित आदेश काढण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील
निर्यातपूर्वक उद्योगांमधील उत्पादन नियमितपणे सुरू राहील. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना आवश्यक कच्चा माल पुरवणारी संपूर्ण साखळी तसेच सतत प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना परवानगी असेल. इतर उत्पादन क्षेत्र ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था संबंधित उद्योगांना करावी लागणार आहे.
दिवसाआड सम-विषम पध्दतीने मुभा
शहरातील बाजारपेठांमध्ये सम-विषम पध्दतीने दिवसाआड ५० टक्के दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मालकासह दुकानातील कर्मचाऱ्यांना दर १५ दिवसांनी करोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय अधिकारी वैद्यकीय विभागाच्या मदतीने करणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध वाढवण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.