पुणे : संततधार पावसामुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चोरटय़ांनी शहरात धुमाकूळ घातला. डेक्कन जिमखाना, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी भागात चोरटय़ांनी सदनिकांचे कुलूप उचकटून चोरी केली तसेच फग्र्युसन रस्त्यावर एका यात्रा कंपनीच्या कार्यालयातून तीन लाखांची रोकड चोरटय़ांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली.

प्रभात रस्ता भागातील कमला नेहरू पार्क परिसरातील ओमकृष्ण अपार्टमेंटमधील रहिवासी संग्राम जाधव  २६) यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री घडली.   जाधव यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस हवालदार डी. आर. पांचाळ तपास करत आहेत.

कोरेगाव पार्क भागातील बोट क्लब रोडवरील एका व्यावसायिकाच्या सदनिकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. महेश रहेजा ( ४३, रा. नेपयन्सी रोड, मुंबई) यांनी या संदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोट क्लब रोडवरील रिव्हर क्रेस्ट सोसायटीत  रहेजा यांच्या सदनिकेचे कुलूप पहाटे तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.    खडकीतील रेंजहिल्स भागात सदनिकेच्या गच्चीत बसविण्यात आलेली जाळी तोडून चोरटय़ांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा १ लाख २४ हजारांचा ऐवज लांबविला. रामचंद्र पाटील (३५, रा. रेंजहिल्स, खडकी) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  आहे.

बिबवेवाडीत सहा सदनिका फोडल्या

बिबवेवाडीतील पूनम पार्क सोसायटीतील सहा सदनिका फोडल्याची घटना उघडकीस आली.  याबाबत पूनम पार्क सोसायटीतील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारदार महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा ४ लाख १७ हजारांचा ऐवज लांबविला. याच सोसायटीतील पुरुषोत्तम साठे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी रोकड आणि चांदीची नाणी लांबविली.  विवेक कुलकर्णी यांच्या घरातून  लॅपटॉप चोरण्यात आला. रमेश मांगडे, दिलीप गायकवाड, अमर जोशी यांच्या घरातही  चोरीचा प्रयत्न झाला.