सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समुदायामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला जात आहे. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी मध्यस्थी करत आणि करोनाच्या परिस्थितीचं गांभार्य सांगत शांतता राखण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं. तसेच त्यानंतर राज्यभर दौरा आणि राजकीय नेत्यांच्या भेटीही ते घेत आहे. आज संभाजीराजेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपण संभाजीराजेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाला शांतता पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करण्याची घोषणा केली. सध्या ते दौऱ्यावर असून, राजकीय नेत्यांच्या भेटीही घेत आहे. संभाजीराजे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले,”बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायची होती, ती आज झाली. यापूर्वी देखील आम्ही अनेकवेळा भेटलो आहे. पण भेट घेण्याचं एकच कारण ते म्हणजे जातीय विषमता कमी करता येईल. बहुजन समाज एकाच छताखाली राहिल. मला शाहू महाराजांचा आणि त्यांना (प्रकाश आंबेडकर) बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो आहे. राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांना भेटलो आहे. शेवट प्रकाश आंबेडकरांकडूनच केला आहे. आता राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे,” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनीही यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “शरद पवार यांचं राजकारण मी ४० वर्षापासून जवळून पाहत आलोय. ते नरो वा कुंजरो वाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation news maharashtra reservation politics chhatrapati sambhaji raje met prakash ambedkar in pune bmh 90 svk
First published on: 29-05-2021 at 17:27 IST