पुणे : नव्या पिढीला मराठ्यांचे साम्राज्य, मराठी अलंकार आणि मराठ्यांचा इतिहास समजावा, यासाठी शिवसृष्टीसोबत एकत्रित काम करण्याचा निर्धार सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केला.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमधील ‘शिवस्मृती’ या दालनाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, श्वेता माळी, ऋतुजा माळी याप्रसंगी उपस्थित होते.
‘शिवस्मृती’ दालन
‘शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर या ठिकाणाची आठवण भेट देणारे नागरिक आणि पर्यटक यांना रहावी, यादृष्टीने शिवसृष्टीमध्ये एक स्मरणिका दालन असावे, असे सुरुवातीपासूनच प्रतिष्ठानच्या मनात होते. ‘शिवस्मृती’ दालनाच्या निमित्ताने याला एक मूर्त स्वरूप आले आहे. त्यामुळे शिवसृष्टीशी संबंधित आठवणी पर्यटकांना आपल्या सोबत ठेवता येतील. या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक पुस्तके, इतर इतिहास विषयक पुस्तके, ग्रंथ, महाराजांशी संबंधित असलेल्या वस्तू, चारुहास पंडित यांची काष्ठ्य शिल्पे, लहान मुलांसाठीचे घरात खेळता येतील असे आणि बैठे खेळ, मावळासारखे कार्ड गेम्स, टी शर्टस, छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे असलेली स्टेशनरी, शिवकालीन तब्बल १०० वर्षांहून अधिक जुने असे मराठी पारंपारिक अलंकार यांचा समावेश असेल,’ अशी माहिती अमृत पुरंदरे यांनी दिली.
प्राजक्ता माळी यांचा संकल्प…
या शिवस्मृती दालनात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्तराज’चे मराठी अलंकार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्याविषयी बोलताना माळी म्हणाल्या, ‘आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेली शिवसृष्टी ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातून साकारत आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकाच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आणि संकल्पनांमधून मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसृष्टी करत आहे. हा सर्व इतिहास आणि ‘प्राजक्तराज’ यांचेही जवळचे नाते आहे. आम्ही देखील १०० हून अधिक वर्ष जुने असलेले केवळ पारंपरिक मराठी अलंकार त्यांच्या मूळ स्वरूपात पुनरुज्जीवित करत आहोत.’
मराठी साम्राज्य, मराठी अलंकार आणि मराठी इतिहास पुढे नेण्यासाठी आता आम्ही शिवसृष्टीसोबत एकत्रितपणे काम करणार असल्याचा संकल्प माळी यांनी व्यक्त केला.
‘शिवसृष्टीमध्ये आम्ही ठेवत असलेले बहुतांश अलंकार हे शिवकालीन आणि पेशवेकालीन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या शिवसृष्टी या आशियातील सर्वांत मोठ्या थीम पार्कमध्ये शिवकालीन दागिने असणे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मराठी इतिहासाप्रमाणे हे अलंकार पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, त्यांनी ते परिधान करावे आणि अभिमानाने मिरवावे,’ असेही माळी म्हणाल्या.
‘शिवसृष्टी सवलतीत पाहता येणार’
‘येत्या १ नोव्हेंबरपासून शिवप्रेमींना सवलतीच्या दरात शिवसृष्टी पाहता येणार आहे. १ नोव्हेंबर पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतीव्यक्ती रु. १०० तर १८ वर्षांपुढील सर्वांना प्रवेशासाठी रु. २०० इतके प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. या आधी शिवसृष्टीचे प्रवेश शुल्क हे रु. ६०० इतके होते, मात्र पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशन यांच्या वतीने प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या ७५ लाख रुपयांच्या निधीमुळे मागील काही महिने यामध्ये सवलत देण्यात आली होती. आता शनिवार दि. १ नोव्हेंबर पासून प्रवेशशुल्काचे नवे दर लागू होतील याची कृपया नोंद घ्यावी,’ असे शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले. त्याबरोबरच सोमवार, ३ नोव्हेंबरला व्यवस्थापनाच्या तांत्रिक कामामुळे शिवसृष्टी एक दिवस बंद राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
