काही जमातींवर गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे. दरोडा, चोऱ्या, खून, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे करण्यात या जमातींमधील चोरटे वाकबगार असतात. अशा जमातींच्या पुनर्वसनासाठी गेल्या काही वर्षांपासून शासन तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याला बऱ्यापैकी यश देखील मिळाले आहे. अशा जमातींमधील अनेक जण समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. चरितार्थासाठी छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करत आहेत. मात्र, काही जण आजही गुन्हेगारीच्याच क्षेत्रात आहेत. किंबहुना चोरी, दरोडे हाच त्यांचा अर्थार्जनाचा मार्ग आहे. मावळातील धामणे गावात काही दिवसांपूर्वी अशाच जमातीतील काही जणांनी दरोडा घातला. झोपेत असलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा आणि त्यांच्या मुलाचा खून करुन ते पसार झाले. हातात आलेला ऐवज घेऊन पसार झालेल्या या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी व्यापक प्रमाणावर शोधमोहीम राबवली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आणि एकंदर गुन्हे करण्याची पद्धत विचारात घेतल्यानंतर नगर जिल्ह्य़ातील एका विशिष्ट जमातीतील दरोडेखोरांचा या गुन्ह्य़ात हात असल्याचा संशय पोलिसांना होता.

तांत्रिक तपास आणि नगर भागातील खबऱ्यांचे जाळे यांचा वापर करुन पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या दरोडय़ाचा शोध सुरू केला आणि अखेर या टोळीला नगर जिल्ह्यात जेरबंद केले. त्यांच्याकडून नगर जिल्ह्य़ातील राहता तालुक्यातील दरोडय़ाचा दुसरा गुन्हाही उघडकीस आला आहे. मावळातील धामणे गावातील रहिवासी फाले यांच्या घरावर २५ एप्रिल रोजी पहाटे दरोडा घालण्यात आला होता. चोरटय़ांनी केलेल्या बेदम मारहाणीत नथू विठोबा फाले (वय ६५), त्यांची पत्नी छबाबाई (वय ६०) आणि मुलगा अत्रीनंदन यांचा मृत्यू झाला. चोरटय़ांनी फाले यांची सून तेजश्री आणि दीड वर्षांच्या नातीला मारहाण केली होती. एकाच कु टुंबातील तीन जणांचे निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती. मावळ तालुक्यात फाले कु टुंब वारकरी संप्रदायातील कु टुंब म्हणून ओळखले जाते. नथू फाले यांचा मावळातील विविध गावांत आयोजित केल्या जाणाऱ्या हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभाग असायचा. फाले, त्यांची पत्नी आणि मुलाचा दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

धामणे गावात दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक सुवेझ हक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. फाले कुटुंबीयांच्या घरातील १ लाख ६६ हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला होता. झोपेत असलेल्या नथू फाले, त्यांची पत्नी छबाबाई आणि मुलगा अत्रीनंदन यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आला होता. दरोडा घालताना प्रतिकार करण्याची संधी द्यायची नाही आणि झोपेत असलेल्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करायचा, अशा प्रकारे गुन्हा करण्याची नगर जिल्ह्य़ातील एका विशिष्ट जमातीतील चोरटय़ांची पद्धत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चोरटय़ांचा माग काढण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांकडे चौकशी क रण्यात आली. गावात अनोळखी व्यक्ती दृष्टीस पडली का?, अशी विचारणा पोलिसांकडून करण्यात आली. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील राहता तालुक्यात दरोडा घालण्यात आला होता. तसेच पुणे जिल्ह्य़ातील यवतनजीक असलेल्या एका वस्तीवर दरोडा घालून ज्येष्ठ दाम्पत्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला तेव्हा तांत्रिक तपासात आरोपींनी गुन्हा करताना मोबाईलचा वापर केला होता, असे लक्षात आले. दरोडा घालण्यापूर्वी त्यांनी फाले यांच्या घराची पाहणी केली होती.

पोलीस तपास सुरू असताना दौंड ते काष्टी रस्त्यावर चोरटय़ांची टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तेथे सापळा लावला आणि नागेश उर्फ नाग्या भगवान भोसले (वय २३, रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), छोटय़ा लहानू काळे (वय ४५, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), बाब्या उर्फ भेज्या जिंद्या चव्हाण (वय २०, रा. कोपरगाव रेल्वे स्थानक  परिसर, जि. अहमदनगर), सेवन उर्फ डेग्या चव्हाण (वय २०, रा. जवळके सोयेगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), दिलीप पांडू चव्हाण (वय २५, रा. खोकना बाजारतळ, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांना पकडले. या टोळीने धामणे येथे दरोडा घातल्याचे तपासात उघड झाले. राज्याच्या अन्य भागातही त्यांनी दरोडे घातल्याचा संशय पोलिसांना आहे. शिक्षणाच्या अभावामुळे या जमातीतील अनेक जण पुणे, नगर जिल्ह्य़ात दरोडे, चोऱ्या अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत. अगदी पाच ते दहा हजारांच्या ऐवजासाठीही झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करुन ते त्या व्यक्तीचा खून करतात. शासन तसेच स्वयंसेवी संस्थांकडून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येतात, मात्र अनेकांनी अद्याप गुन्हेगारीचा मार्ग सोडलेला नाही.