पुणे : ‘सध्या राज्यांची विकासनीती संविधानातील तत्त्वांच्या आधारे ठरवली जात नाही. आर्थिक असमानता नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्तीही दिसत नाही. मात्र, काही अब्जाधीशांनाच ठरवून मोठे केले जात आहे,’ अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.
समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘समाजवादी संमेलना’त ‘विकासाच्या संकल्पनेपुढील आव्हाने आणि समाजवादी पर्याय’ या विषयावरील सत्रात पाटकर बोलत होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अर्थतज्ज्ञ हितेश पोतदार, पर्यावरणतज्ज्ञ सौम्य दत्त, किसान संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. आराधना भार्गव चर्चासत्रात सहभागी झाले होते. लोकशक्ती अभियानचे संयोजक प्रफुल्ल सामंतरा यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.
पाटकर म्हणाल्या, ‘आजच्या काळात विकास हा मंत्र झाला आहे. मात्र, आर्थिक असमानता यालाच विकास म्हटले जात आहे. मणिपूरमधील हिंसाचार केवळ दोन समाजांतील नाही. त्याच्या मुळाशी हा विकास आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस केली जात आहे.’
‘देशात गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत. गरिबी आणि श्रीमंती हा मोठा भेद आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान सांगतात, की श्रीमंत होणे हे पाप नाही. देशातील, राज्यातील अनेक जागा काही उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहेत,’ असा टोला सपकाळ यांनी लगावला. ‘काँग्रेस आणि समाजवादी चळवळ यांचे पूर्वापार संबंध आहेत. मात्र, समाजवाद्यांचे आणि काँग्रेसचे संबंध हे ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असेच राहिले आहेत,’ अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘सामाजिक न्याय – जनआंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन’ या विषयावर दुसरे सत्र झाले. त्यात मधू मोहिते, निरंजन टकले, सुशीला मोराळे, रत्ना व्होरा यांनी सहभाग नोंदवला.
‘सरकार कुणाचेही असो, सत्ता मात्र आमच्याच हाती असली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही रणनीती आहे,’ अशी टीका कोळसे पाटील यांनी केली, तर ‘शाळेच्या अभ्यासक्रमातून खोटा आणि विखारी इतिहास शिकवला जात असून, त्याविरोधात प्रतिकार करायला हवा,’ असे टकले म्हणाले.
‘निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचार’
‘समृद्धी महामार्ग उभारणीत २० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर राज्यातील पक्ष फोडण्यासाठी, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आला,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.