‘कॅशलेस’ (विनारक्कम) वैद्यकीय विम्याच्या सुविधेसाठी अधिक प्रीमियम भरूनही वैद्यकीय सेवा मात्र ‘कॅशलेस’ मिळतच नसल्याचा अनुभव शहरातील रुग्ण घेत आहेत. ‘अधिकचा प्रीमियम भरूनही हवी ती सेवा मिळणार नसेल तर जास्तीचे पैसे कशासाठी भरायचे,’ असा प्रश्न काही रुग्णांनी उपस्थित केला.
सध्या कॅशलेस वैद्यकीय विमा पॉलिसी घेतलेल्या रुग्णांना आयत्या वेळी पैशांच्या जमवाजमवीसाठी पळापळ करावी लागत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्यांपैकी (जिप्सा) एका कंपनीच्या विमा दरपत्रकावरून कॅशलेस सुविधेसाठी जास्तीचा प्रीमियम घेतला जात असल्याची बाब समोर आली आहे. याविषयी संबंधित कंपनीच्या प्रादेशिक कार्यालयात ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला.
लहान रुग्णालयांच्या संघटनेचे प्रमुख डॉ. नितीन भगली म्हणाले, ‘‘ कॅशलेससाठी वेगळे पैसे घेऊनही किरकोळ विमा ग्राहकाला ती सेवा मिळत नाही ही खेदाची बाब आहे. सार्वजनिक क्षेत्रातील चार विमा कंपन्या रुग्ण आणि रुग्णालयांची गळचेपी करत आहेत. याला एमआरटीपी कायद्याचे (मोनोपॉलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस) उल्लंघन मानता येणार नाही का? कॅशलेसप्रश्नी ठोस निर्णय करण्यात होणारी दिरंगाई सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे. यासंबंधी आम्ही अर्थमंत्री आणि ‘आयआरडीए’ला (इन्श्युरन्स डेव्हलपमेंट रेग्युलेटरी अॅथॉरिटी) पत्र पाठवले आहे.’’
शहरातील एकूण ११० रुग्णालयांमध्ये कॅशलेस वैद्यकीय विम्याची सुविधा उपलब्ध आहे. यात ७५ लहान रुग्णालये असून विमा कंपन्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी ठरवून दिलेले दर परवडण्याजोगे नाहीत. तसेच विमा कंपन्यांच्या अटी एकतर्फी असून त्यात पारदर्शकता नाही, असे सांगत या रुग्णालयांनी १ डिसेंबरपासून कॅशलेस सुविधा बंद केली. तर, मोठय़ा रुग्णालयांनी केवळ ‘कॉर्पोरेट’ ग्राहकांची कॅशलेस सुविधा सुरू ठेवली.
‘जिप्सा’ कंपन्यांपैकी एका विमा कंपनीच्या दरपत्रकानुसार ग्राहकांना कॅशलेस सुविधेसाठी खालीलप्रमाणे अधिक पैसे भरावे लागत आहेत.
विम्याची एकूण रक्कम / ग्राहकाचा वयोगट/ कॅशलेस सुविधेसह/ कॅशलेस सुविधेविना प्रीमियम
५०,००० ६-२५ ८८१ ८३१
५०,००० ४६-५५ २,१५८ २,०३६
५०,००० ६०-६५ ३,१४९ २,९७१
१,५०,००० ६-२५ १,९०१ १,७९३
१,५०,००० ४६-५५ ४,८२६ ४,५५३
१,५०,००० ६०-६५ ७,९८९ ७,५३७
–