येरवडा तुरुंगाच्या माजी अधीक्षक मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याचे मध्यवर्ती कारागृह असलेल्या येरवडा कारागृहाचा लिलाव पूर्ण झाला असून त्याचे हस्तांतरण करण्याच्या सूचना पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी (अजित पवार) दिल्या होत्या, असा दावा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. यावरून राज्यात अजित पवार यांच्याविरोधात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच अजित पवारांबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. यावर स्वतः मीरा बोरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा बोरवणकर यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्या म्हणाल्या, पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी जागेचा लिलाव यशस्वी झाला असून जागेचा ताबा सर्वाधिक बोली लावणाऱ्याला देण्यास सांगितलं होतं. परंतु, येरवडा कारागृह ही खूप महत्त्वाची जागा आहे. क्वाटर्ससाठी अशी जागा पुन्हा मिळणार नाही. त्याचबरोबर लिलाव आधीच पूर्ण झाला होता, तर त्याच वेळी हस्तांतरण का केलं नाही? असा प्रश्नदेखील बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सरकारी जागेवर बांधकाम व्यासायिकाची नजर असतेच, त्याच्यापासून ती जागा वाचवणं आणि सार्वजनिक हितासाठी वापरणं ही आपली जबाबदारी आहे, असंही बोरवणकर म्हणाल्या.

यावेळी बोरवणकर यांनी त्यांच्या तुरुंगात असलेले कैदी दहशतवादी अजमल कसाब आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबद्दलही प्रतिक्रिया दिली. बोरवणकर म्हणाल्या, संजय दत्तला रात्रीच्या वेळी मुंबईहून पुण्यातील येरवडा तुरुंगात आणलं तेव्हा तो आजारी होता. तो इतरांसाठी सेलिब्रेटी असला तरी आमच्यासाठी गुन्हेगार होता. त्याला पुण्याला हलवायचं ठरलं होतं. आधी एकदा तसा प्रयत्न केला तेव्हा प्रसारमाध्यमांचे लोक पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करू लागले. तो सगळा प्रकार हास्यास्पद होता. त्यामुळे आम्ही त्याला आर्थर रोड तुरुंगातून येरवड्याला आणण्यासाठी रात्रीची वेळ निवडली. त्यावेळी संजय दत्त खूप घाबरला होता. त्याला वाटलं की त्याचा रस्त्यात कुणीतरी एन्काऊंटर करेल.

हे ही वाचा >> पोलिसांच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा आदेश अजित पवार यांच्याकडून, बोरवणकर यांच्या आत्मचरित्रात नाव न घेता आरोप

मीरा बोरवणकर यांना दहशतवादी अजमल कसाबबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, फाशी देताना कसाब लहान मुलासारखा दिसत होता. कसाबला आम्ही येरवड्याला आणलं तेदेखील आमच्यासाठी आव्हान होतं. त्याला आर्थर रोडमधून बाहेर काढणं, क्राईम ब्रांचकडून त्याचा ताबा घेणं आणि येरवड्याला आणणं ही एक गुप्त मोहीम होती. परंतु, मुंबईतल्या एका पत्रकाराला कसाबला पुण्याला आणणार हे समजलं. आम्ही त्याला फाशी द्यायला येरवड्यात आणत आहोत हे त्या पत्रकाराला माहित नव्हतं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera borwankar says ajmal kasab looks like child during execution asc
First published on: 16-10-2023 at 19:14 IST