पुणे : शहरातील स्तनपान करू न शकणाऱ्या माता आणि मुदतपूर्व जन्माला आलेली बालके किंवा ज्यांना आई नाही अशी बालके यांना आईचे दूध मिळणे आता सहज शक्य होणार आहे. वाकड येथील सूर्या हॉस्पिटलने नुकतीच मानवी दुग्धपेढी (ह्यूमन मिल्कबँक) सुरू केली असून शहरातील ही सातवी मानवी दुग्धपेढी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात सुमारे १५ लाख बाळांचा जन्म हा मुदतपूर्व होतो. त्या पाच पैकी एक बाळ भारतात जन्माला येते. त्यामुळे पाच वर्षांखालील बाळ दगावण्याचा धोकाही भारतात सर्वाधिक आहे. नवजात बाळ मुदतपूर्व जन्माला आलेले असले तरी आईचे दूध त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अकाली मृत्यू, जिवावर बेतणारे संसर्ग आणि या बाळांना घडणारा रुग्णालयातील दीर्घ मुक्काम या बाबी आईच्या दुधामुळे टाळणे शक्य असते. त्यामुळे शहरातील ही सातवी दुग्धपेढी माता आणि बालकांसाठी वरदान ठरणार आहे.

हेही वाचा >>> पुण्यात ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची रंगकर्मींवर वेळ, नेहरू सांस्कृतिक भवनमधील यंत्रणा निकामी

वाकडमधील सूर्या हॉस्पिटलच्या मानवी दुग्धपेढीचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. रुग्णालयाचे नवजात शिशू विकार तज्ज्ञ डॉ. सचिन शहा म्हणाले,की आमच्याकडे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांपैकी ९० टक्के महिला या मुदतपूर्व प्रसूतीसाठी येतात. सुमारे ७० टक्के प्रसूती ३२ व्या आठवड्यातच होतात. प्रत्येक नवजात बाळाला आईकडून स्तनपान मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मात्र, तसे शक्य नसते त्या वेळी मानवी दुग्धपेढी हा पर्याय आश्वासक ठरतो. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात अंदाजे तीन लिटर मानवी दुधाची गरज भासते.

हेही वाचा >>> पुणे : यंदा घरांच्या किमतींमध्ये वाढ?, सर्वेक्षणातील निष्कर्ष

स्तनपान सल्लागार डॉ. मनीषा खलाणे म्हणाल्या,की ‘फॉर्म्युला मिल्क’ हे आईच्या दुधाला पर्याय ठरू शकत नाही. कारण आईच्या दुधातील रोगप्रतिकारशक्ती, अनेक रोगांविरुद्ध प्रतिपिंडे आणि अतिरिक्त हार्मोन्स फॉर्म्युला मिल्कमध्ये नसतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक आई स्तनपान करू शकते. प्रसूतीनंतरचे नैराश्य, गंभीर आजारपण आणि हार्मोनल बदल अशा काही अपवादात्मक परिस्थितीत जी आई आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाही तिच्या बाळासाठी मानवी दुग्धपेढी हे वरदान ठरते.

दुग्धपेढीला दूध देण्यासाठी

आपल्या बाळाची स्तनपानाची गरज पूर्ण केल्यावर अतिरिक्त प्रमाणातील दूध हे आई नवजात बाळासाठी मानवी दुग्धपेढीला दान करू शकते. त्यासाठी काही प्राथमिक चाचण्या केल्या जातात. हे दूध पाश्चराईज करून लहान बाटल्यांमध्ये संकलित करुन फ्रीजमध्ये साठवले जाते. गरजेप्रमाणे फ्रीजमध्ये गोठवलेले हे दूध वितळवून बाळाला दिले जाते. सूर्या रुग्णालयातील दुग्धपेढीला दूध दान करण्यासाठी निरोगी नवजात मातांनी रुग्णालयाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk for newborns it will be easy for the born babies to get mother milk pune print news bbb 19 ysh
First published on: 17-01-2023 at 09:40 IST