पुणे : ‘महागाई, जागतिकीकरणामुळे ज्येष्ठांच्या समस्या अधिक गुंतागुतीच्या होत आहेत. पण, ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू,’ असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (ॲस्कॉप), लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, कर्वे समाज शिक्षण संस्था, फेस्कॉम यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ नागरिकांचा राज्यस्तरीय महामेळावा झाला. त्या वेळी शिरसाट बोलत होते.
ते म्हणाले, ‘खचून न जाता जगणे हा एक संघर्ष मानून रोजचे जगणे ज्येष्ठांनी आनंददायी केले पाहिजे. मीही ६४ वर्षांचा झाल्याने ज्येष्ठ नागरिक झालो आहे. रोजच्या जगण्यातील व्यथा, अडचणी अनेक आहेत. पण, अपेक्षाविरहित आयुष्य जगल्यास आयुष्य अधिक सुखी होते, हा कानमंत्र लक्षात ठेवावा.’ समाजकल्याण विभागाचे प्रभारी आयुक्त प्रवीण पुरी, उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त विशाल लोंढे, मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशनचे सुधीर मांडके, फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, अरुण रोडे, ॲस्कॉपचे दिलीप पवार, ऊर्मिला शेजवलकर, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्थेचे डॉ. महेश ठाकूर, जनसेवा फाउंडेशनचे स्मितेश शहा या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठांच्या समस्यांबाबत कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशनही झाले.
‘ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे’
ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर करूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याची टीका दिलीप पवार यांनी केली. तसेच, ‘ज्येष्ठांसाठीच्या समित्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना प्रतिनिधींचा समावेश करावा, पुणे महापालिकेत ज्येष्ठांच्या समस्यांसाठी स्वतंत्र कक्ष करावा, खासगी वृद्धाश्रम शासनाच्या अधिपत्याखाली आणावे, ज्येष्ठांच्या बँक ठेवींवरील व्याजदर वाढवावा, सर्व कर माफ करावेत, रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरू करावी, ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे,’ अशा मागण्याही त्यांनी केल्या.
‘उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास भेट घेईन’
‘राजकीय बाजू सोडून आम्ही काही नाती जपतो. मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलाविल्यास भेट घेईन. मात्र, हा भाग राजकारणाव्यतिरिक्त असेल. भविष्यात अशी भेट झाली, तर त्याबाबत वेगळा अर्थ काढला जाऊ नये,’ असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यावरूनही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.