पुणे : सर्वसमावेशक आणि सक्षम कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनसीडीसी) ‘स्कील इंडिया डिजिटल हब’ (सिध) हे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. मातृभाषेतील शिक्षण प्रभावी ठरत असल्याने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, एनएसडीसी यांनी स्थानिक भाषांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता हे ॲप मराठीमध्ये सादर करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते ‘स्कील इंडिया डिजिटल हब’च्या मराठी आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्रस्तावित केल्यानुसार एकूण २३ भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या ॲपमध्ये ७ हजारांहून अधिक कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात इंडस्ट्री ४.०, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान अशा विषयांचाही समावेश आहे.

ॲपवरील नोंदणीमध्ये देशातील आघाडीच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी आयटी-आयटीईएस, उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये झाली आहे. विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी ४३ हजारांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक महिला ३० वर्षांखालील आहेत. राज्यात वेब डिझाइन, सायबरसुरक्षा आणि किसान ड्रोन ऑपरेटर हे सर्वाधिक लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत. या ॲपच्या वापरकर्त्यांपैकी ३० टक्के वापरकर्ते महाराष्ट्रातील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषा हा कौशल्य विकासातील अडथळा ठरू नये, या दृष्टीने ॲपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करण्यात आली आहे. या ॲवर गेल्या वर्षभरात देशपातळीवर १.२६ कोटीहून अधिक नोंदणी झाली आहे. तसेच हजारो कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता मराठी भाषेचा समावेश झाल्यामुळे मराठी भाषक युवकांना कौशल्य विकासाद्वारे सक्षम करणे, करिअरच्या संधी निर्माण करून देणे शक्य होणार आहे, असे एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी यांनी सांगितले.