राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार सोमवार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी  पुण्यात माध्यामांशी बोलताना उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, मुळात त्यांच्या मनात एवढ्या वेदना होत आहेत की, त्यांचा २५ वर्षांपासूनचा मित्र पक्ष शिवसेना त्यांच्यापासून बाजूला गेल्यामुळे त्यांच्या आमदारांची संख्या १०५ असुनही त्यांना सरकार बनवत आलं नाही. हे दुःख त्यांच्या मनात खूप वेदना देऊन जात आहे. म्हणून सातत्याने अशाप्रकारची वक्तव्यं त्यांच्याकडून केली जात आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नागपूर अधिवेशानात देखील अशाप्रकारची काही वक्तव्य केली गेली, त्या वक्तव्यांबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. शेवटी कुणी काय सांगांव, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते व कावळ्याच्या शापानं गुरे मरत नसतात, अशा मराठीत म्हणी आहेत. त्यामुळे कुणीतरी काहीतरी सांगितलं याला काही अर्थ नसतो. ज्याच्या मनात अशाप्रकारची भावाना असती तोच माणूस बोलून दाखवतो, त्या करता आणखी एक म्हण आहे ती म्हणजे चोराच्या मनात चांदणं असतं, चंद्रकांत पाटील यांना माहिती पाहिजे की, कोणतीही खाती कुणाकडे जरी असली, तरी राज्याचा प्रमुख जो असतो तोच सर्व खात्यांचा प्रमुख असतो. कुठल्याही खात्यासंदर्भातला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असतो, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

अर्थखातं, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहमंत्रिपदही दिलं तर तुमच्याकडे काय केवळ मुख्यमंत्रिपद ठेवणार का ? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशुन केला होता. तसेच, अनेक शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.