पुणे : शहरात अचानक पडलेल्या पावसानंतर पाण्याचा निचरा न झाल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा दर्जा चव्हाट्यावर आल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोथरूडसह शहरात कोठेही पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेला केल्या.
गेल्या आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, ‘पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पाणी साचणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी,’ अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. मात्र, त्यानंतरही शहरात अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी वाहून जाण्यास अडचणी आल्या. पाण्याचा निचरा न झाल्याने त्याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शनिवारी कोथरूड मतदारसंघामधील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, दिनेश गोजारे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गणेश सोनुने, आशा राऊत, करसंकलन विभागाचे अविनाश सपकाळ यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी, भाजप कोथरूड मध्य मंडल अध्यक्ष नीलेश कोंढाळकर, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘हवामान विभागाने यंदा ११७ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी कोथरूडसह शहरातील कोणत्याही भागात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असे पाटील म्हणाले.
पावसाचे पाणी वाहून नेणारे शहरात २०१ मुख्य नाले असून, त्यांपैकी १५ नाले कोथरूड मतदारसंघात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून, उर्वरित काम जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी १०० स्वयंसेवक नेमावेत, तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या पावसाळापूर्व कामांची पाहणी करून २४ तासांत अहवाल सादर करावा, अशा सूचना या भागातील माजी नगरसेवकांना पाटील यांनी केल्या.