पिंपरी- चिंचवड: ‘त्या’ गुन्हेगारांवर कुणाचा वरदहस्त आहे? कुणाच्या पैशांच्या जोरावर ते बाहेर आले. असा संतप्त सवाल आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. हत्येचा कट पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळला होता. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट काही महिन्यांपूर्वी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला. सात आरोपींना, नऊ पिस्तुल आणि ४२ जिवंत काढतुसांसह पकडलं होत. हे सर्व आरोपी जळगाव, मध्यप्रदेश आणि मावळ तालुक्यातील होते. या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. यावर आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले, “हे आरोपी मावळ, जळगाव आणि मध्यप्रदेश येथील होते. मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांचा कट पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला. आरोपींनी सर्व काही कबूल केलं होतं.” आरोपींना शिक्षा झाली आहे. ते आता बाहेर आले आहेत. ते कुणाच्या पैशांवर बाहेर आले आहेत. कुणाचा त्यांच्यावर वरदहस्त आहे? या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे. यासाठी मी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. याप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या सर्वांची उत्तरं लवकरच मिळतील. अशी अपेक्षा आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे.