पुणे : राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज, गुरुवारी (६ नोव्हेंबर) पुणे शहर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील. मनसेच्या शाखा अध्यक्षांना ते मार्गदर्शन करतील.
तीन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली असून, मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत होत असलेल्या ‘मतचोरी’च्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या मोर्चातही सहभागी झाले होते. सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे यांनी टीका केली आहे. असे असले, तरी राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीबरोबर लढणार की नाही, याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही.
तीन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बैठक घेतली होती. त्यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली असून मनसेने महाविकास आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
मुंबईत मतचोरीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रित बैठक घेतली होती.
निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शाखा अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाजवळील एका सभागृहात ही बैठक होणार असून, यामध्ये राज ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करणार याकडे पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका काय राहील, याचा निर्णय होईल, असे मनसेच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
