पुणे :‘पुणे महापालिकेने दक्षिण पुण्यातील भागात सुरू केलेली पाणीकपात मानवनिर्मित आहे. पाणीगळती आणि पाणीचोरी यामुळे ही कपात करावी लागली आहे. अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी आणि राजकीय दबावापोटी या भागातील नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे,’ असा आरोप करून पाणीकपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने केली आहे.

‘मनसे’चे सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत निवेदन दिले. रोहित गुर्जर, प्रशांत भोलागीर, प्रियंका पिसे, हनुमंत मोहिते, केदार कोडोलीकर यावेळी उपस्थित होते.

‘शहरात बहुतांश ठिकाणी पाणी मीटर असताना महापालिकाच्या पाणीपुरवठा विभागाचे मीटरवर नियंत्रण का नाही, मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाणी गळतीचे महापालिकेने ऑडिट केले आहे का, पैसे घेऊन पाणी सोडणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’वर पालिकेचे नियंत्रण का नाही,’ असे प्रश्न ‘मनसे’ने उपस्थित केले आहेत. ‘महापालिकेने कपात तातडीने रद्द न केल्यास ‘मनसे’च्या पद्धतीने आंदोलन केले जाईल,’ असा इशारा संभूस यांनी दिला.