मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यामुळे एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना राज ठाकरेंच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. त्यातच आता राज ठाकरे उद्या हनुमान जयंतीला पुण्यात असतील हे स्पष्ट झालं आहे. पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ही महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला असल्याने येत्या हनुमान जयंतीला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र याबद्दल आता स्पष्टता झाली आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे.

मुंबईतील गुढीपाडव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर ठाण्यात उत्तरसभा घेत होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे मुंबई, ठाण्यानंतर आता राज ठाकरेंनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात पोहोचणार आहेत. यानंतर शनिवारी मंदिरात ही महाआरती होणार असून त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.