मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा आपल्या पक्षावर नाराज असून नुकतीच पुण्यात अमित ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांनी आपली बाजू ऐकून घेण्यासाठी बोलावलं होतं असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या नाराजीसाठी शहर कार्यालय जबाबदार असल्याचं सांगितलं आहे, तसंच बैठकीसाठी स्मशानभूमीत येईन, पण मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही असंही ठणकावून सांगितलं.

कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “हा स्वाभिमानाचा विषय नाही. माझा स्वाभिमान दुखावला जात नाही. कोअर कमिटीने एखाद्या स्मशानभूमीत बैठक घेतली तर तिथेही जाईन, पण शहर कार्यालयात जाणार नाही. जिथं फुलं वेचली तिथे काटे वेचायला जाणार नाही”.

मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार? अमित ठाकरे भेटीनंतर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले “इतर पक्षात जर…”

शहर कार्यालयात न जाण्याचं कारण विचारलं असता ते म्हणाले “मी तिथे अनेक स्वप्नं पाहिली होती. महानगरपालिका जिंकल्यानंतर गुलाल उधळण्याचं, नगरसेवक निवडून आल्यानंतर पेढे वाटण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण माझं पद गेल्यावर गुलाल उधळण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यामुळे मी त्या पक्ष कार्यलयात जाणार नाही”.

“शहर कार्यालय नसताना कोअर कमिटीच्या एका सदस्यावर परिसरातील एखाद्या हॉटेलमध्ये बैठक घेण्याची जबाबदारी असायची. पण मग आता जागेचा हट्ट का केला जात आहे. याआधी शहर कार्यालयात बैठका होत नव्हत्या. शेवटी ते पण अडवणूक करत आहेत. मी काय भारत-पाकिस्तान सीमेवर चर्चेसाठी बोलवत नाही. एखाद्या शाखाध्यक्षाच्या घरी घेतली तरी मला चालेल. पण जिथे माझ्याविरोधात कारस्थानं झाली तिथे जावंसं वाटत नाही”.

मोठी बातमी! मनसेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज?

“मनसेमध्ये एकत्रित बसवून मिटवायची इच्छा दिसत नाही. माझं एकत्रित कुटुंब आहे. आम्हा भावांमध्ये आजही वाद होतात, पण आम्ही सगळे एकत्र बसून मिटवतो. इथे तसं होताना दिसत नाही,” अशी खंत वसंत मोरेंनी बोलून दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अजूनही मनसेतच

“मी माझी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर क्लिप टाकली होती. त्यानंतर मी स्पष्ट केलं होतं. मला जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो. मी पक्ष सोडणार असं सांगितलेलं नाही. इतर पक्षातील लोक जर मला त्यांच्या पक्षात घेण्यास इच्छुक असतील तर यात माझी चूक नाही,” असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.