मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांच्या नाराजीची सध्या पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. याआधीही वसंत मोरेंनी पक्षांतर्गत राजकारणाचा दाखला देऊन थेट राज ठाकरेंपर्यंत आपली तक्रार पोहोचवली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर ही नाराजी दूर होऊन वसंत मोरे पु्न्हा एकदा पक्षात सक्रीय झाले होते. मात्र, आता एका बॅनरवरून पुण्यातील मनसे गटात अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वसंत मोरेंनी या बॅनरबाबत आपला आक्षेप नोंदवला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या कसबा पेठ भागात मनसेकडून रामनवमीच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, या आरतीसाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर मनसे सरचिटणीस वसंत मोरेंचं नाव किंवा फोटोही छापला नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यासंदर्भात वसंत मोरे यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

वसंत मोरेंनी यावेळी बॅनरबाबत सविस्तर भूमिका मांडली. “मला एका मित्राने त्या बॅनरचा फोटो पाठवला. त्यात कोअर कमिटीतल्या ११ लोकांपैकी ९ लोकांची नावं आहेत. मला विशेष याचं वाटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसब्यातले आरएसएसचे कार्यकर्ते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत ही आरती होणार आहे. बॅनरवर त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसाचं नाव जर त्या बॅनरवर असेल, तर मग मनसे सरचिटणीस वसंत मोरेचं नाव त्या बॅनरवर का नसावं?” असा प्रश्न वसंत मोरेंनी उपस्थित केला आहे.

“सध्या राजकारणात प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत”, उद्धव ठाकरेंचा टोला!

“हे जाणूनबुजून केलं जातंय”

वसंत मोरेंनी हे जाणूनबुजून केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी बोलणं झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं. “मला तरी वाटतं की हे जाणून-बुजून केलं जात आहे. कुठेतरी वाद निर्माण करायचा. माझं नाव टाकायचं नाही. एखाद्याला वाटतं की आपण सूर्यावर झाकण टाकू. झाकल्यानं कोंबडं आरवायचं राहातं का? दिवस उगवतोच ना? असं काही होत नसतं. त्यांना या गोष्टी कळायला हव्यात. वारंवार हे वाद घालायचे आणि काहीतरी वेगळी चर्चा घडवून आणायची हे यांचं सगळं षडयंत्र आहे”, असं वसंत मोरे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला आता राज ठाकरेंशी याबाबत बोलावं लागेल”

“यांना बरेच दिवस काही नसेल तर या गोष्टी लागतात. पण मलाही या गोष्टींचा राग येतोय. जर या लोकांना एवढा माझा त्रास होत असेल, तर मलाही काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागेल. राज ठाकरेंशी मला या गोष्टी मला बोलाव्या लागतील. एकतर यांना जाब विचारा किंवा मला तरी सांगा की मी काय करू आता”, अशी निर्वाणीची भूमिका वसंत मोरेंनी घेतली आहे.