लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भाजपचेच नेते राज्यघटना बदलाची भाषा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यघटना बदलणार नाही, आरक्षण रद्द करणार नाही, असे सांगत आहेत. मोदी सर्व प्रकारची ‘गॅरेंटी’ देत असताना त्यांच्या जाहीरनाम्यात राज्यघटनेची ‘गॅरेंटी’ नाही. त्यामुळेच त्यांचा राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची टीका माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. राऊत बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, अनुसूचित जाती-जमातीचे शहराध्यक्ष सुजीत यादव, गौतम वानखेडे, माध्यम समन्वयक राज अंबिके आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-अवकाळी पावसाचा जोर वाढणार… हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट कुठे?

डॉ. राऊत म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे घेऊन जात आहेत. विरोधातील आवाज दाबून एक प्रकारची हुकूमशाही देशात चालू आहे. भाजपाने दिलेली चारशेपारची घोषणा देशाचे राज्यघटना बदलण्यासाठीच दिली आहे. संपूर्ण देशात भाजपविरोधी लाट असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता बिघडली आहे. त्यांना पराभवाची मोठी भीती वाटत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून दिसत आहे. लोक बोलत नसले, तरी मतदानातून त्यांचा राग बाहेर पडेल.

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणत आहेत. राज्यातील एससी, एसटी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लागू केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा; म्हणाले, चार जूननंतर शरद पवार, उद्धव ठाकरे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग

काँग्रेस पक्षाने पुणे लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच ओबीसी उमेदवार देऊन ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग केला आहे. सामान्य लोकांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने काम करणारा उमेदवार दिल्याने काँग्रेसला पाठिंबा वाढत आहे. पुणेकर मतदार सूज्ञ असल्याने ते योग्य निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले. पुण्याचे वैभव निर्माण करण्यात कॉंग्रेसचे महत्वपूर्ण योगदान आहे. कॉंग्रेसमुळेच पुण्यात अनेक संस्था, आयटी पार्क उभे राहिले. कॉंग्रेसच्या विकासाच्या दृष्टीमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.