पुणे : महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केलेल्या गुंडाची सरबराई करणे पोलिसांच्या अंगलट आले. येरवडा कारागृहात नेत असताना बंदोबस्तावरील तीन पोलिसांनी त्याला परस्पर एका उपहारागृहात नेले. उपहारागृहात पोलिसांना गुंगारा देऊन गुंड पसार झाल्याचे चैाकशीत  उघड झाल्यानंतर तीन पोलिसांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे पोलीस उपायुक्त राेहिदास पवार यांनी दिले.

हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणारा गुंड राजेश रावसाहेब कांबळे (वय ३६, रा. काळेपडळ , हडपसर)  बुधवारी (२ ऑगस्ट) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. न्यायालयातून कारागृहात नेताना तिघा पोलिसांनी कांबळे याला परस्पर एका उपाहारगृहात नेले होते व तेथून त्याने पळ काढला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त रोहिदास पवार यांनी  पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, राजूदास रामजी चव्हाण यांच्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांबळे याच्याविरुद्ध खून, खुनी हल्ले आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का ) कारवाई करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीसाठी बुधवारी (२ ऑगस्ट) पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणले होते. कामकाज संपल्यावर त्याला पुन्हा  कारागृहात नेण्यापूर्वी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला एका उपाहारगृहात नेले होते. तेथे त्यांना बोलण्यात गुंतवून कांबळे पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात नाकाबंदी करून, त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही.