पुणे : कोकणातून द्रुतगती घेत थेट मुंबई-पुण्यापर्यंत मोसमी पावसाने मजल मारली असली, तरी अद्याप तो अपेक्षेनुसार बरसलेला नाही. रविवारी त्याची प्रगतीही झाली नाही. मात्र, पुढील २४ तासांत तो राज्याच्या आणखी काही भागांत प्रवेश करील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात काही भागांत जोरदार, तर उर्वरित राज्यात पुढील दोन-तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मोसमी पावसाने ३१ मे रोजी कर्नाटकातील कारवापर्यंत धडक मारली होती. मात्र, त्यानंतर प्रतिकूल हवामानामुळे तब्बल नऊ दिवस त्याची पुढे वाटचाल झाली नव्हती. अखेर १० जून रोजी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मोसमी पावसाने दक्षिण कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने कोकणाचा बहुतांश भाग व्यापून मध्य महाराष्ट्रातही मजल मारली. अगदी मुंबई-पुण्यापर्यंत तो पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी मुंबई, पुणे आणि परिसरामध्ये पूर्वमोसमी पाऊस जोरदार कोसळला होता. मात्र, मोसमीच्या आगमनानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. अगदी तुरळक भागांत हा पाऊस पडत आहे.

मोसमी पाऊस मुंबई, ठाणे, पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा त्याचप्रमाणे रायगड आदी जिल्ह्यांतही दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मात्र, पावसाचा जोर सध्या कमी आहे. दुपारी बहुतांश भागात ऊन, तर काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणात काही भागांत पाऊस होणार आहे. मध्य-पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या बाजूने मोसमी पावसाची प्रगती नऊ दिवसांपासून थांबली असून, तेथेही दोन दिवसांत प्रगती होईल, असा अंदाज आहे.

अंदाजानुसार..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या आणखी काही भागांत प्रगती करण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तो मराठवाडय़ाच्या काही भागांत प्रवेश करील.