पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी संशयित गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ याला बुधवारी पकडले.

नक्की वाचा >> विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात २९ मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?

संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणी जाधवला अटक करण्यात आली होती. राजस्थानातील कारागृहात तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली.

नक्की वाचा >> Moosewala Murder Case: “त्याने हत्या केली असेल तर…”; पुण्यातील शार्प शूटर संतोष जाधवच्या आईचं भावनिक आवाहन

दरम्यान, मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कारवाईनंतर पसार झालेला आरोपी महाकाळ पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. महाकाळला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुसेवाला खून प्रकरणात आतापर्यंत पंजाब पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये कापत करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.