मीटरबाबत विलंबासाठी थेट वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीजजोडासाठी किंवा नादुरुस्त झालेले वीजमीटर बदलून घेण्यासाठी मीटरच्या उपलब्धतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केल्या जात असताना महावितरण कंपनीकडून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल १ लाख ७५ हजार नवे मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुणे विभागासाठी सद्य:स्थितीत ८८ हजारांहून अधिक मीटर उपलब्ध आहेत. ही संख्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट असल्याने वीज मीटर उपलब्ध नसल्याच्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये. त्याचप्रमाणे नवी जोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्याबाबत विलंब होत असल्यास थेट वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यसाठी सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी एक लाख नवीन वीजमीटर लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. तसेच, नादुरुस्त वीजमीटरही तातडीने बदलण्यात यावेत, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक  संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. या कामात विलंब झाल्यास किंवा वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ताकसांडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यंत ६ फेब्रुवारीपर्यंत सिंगल फेजचे तब्बल १ लाख ५५ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त साधारणपणे आणखी १ लाख नवीन मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत  पुणे जिल्ह्य़ात सिंगल फेजचे ८८,१००, साताऱ्यात १२,२५०, सोलापूरमध्ये १५,८००, कोल्हापूरसाठी १०,५०० आणि सांगली जिल्ह्यत २५,७६० नवीन वीज मीटर उपलब्ध आहेत.

महावितरणने साधनसामग्री व्यवस्थापनाची प्रक्रिया ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ऑनलाइन केलेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता आणि पुरवठय़ाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे. आवश्यकतापेक्षा अधिक मीटरची उपलब्धता असल्याने याबाबत कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना ग्राहकांनी थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विलंब झाल्यास येथे तक्रार करा

नवीन वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटर बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या स्थानिक वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क  साधावा. त्याचप्रमाणे मुंबई येथील विशेष मदत कक्षातील ०२२-२६४७८९८९ किंवा ०२२-२६४७८८९९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. चोवीस तास सुरू  असलेल्या १९१२ किंवा १८००२००३४३५ तसेच १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क  साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

आठवीतील विद्यार्थीनीच्या लघुपटाची राष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठी निवड

पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या कस्तुरी मिलिंद कुलकर्णी हिने आयुर्वेदातील उपचार पद्धती या विषयावर केलेल्या लघुपटाची दखल भारत सरकारच्या विज्ञान प्रसार खात्याने घेतली आहे. आजीबाईचा बटवा असे कस्तुरीने तयार केलेल्या लघुपटाचे नाव असून विज्ञान प्रसार विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान महोत्सवामध्ये या लघुपटाची निवड करण्यात आली आहे. १३ ते १५ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी या लघुपटात काम केले आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कस्तुरीने केले आहे.

पुरातन काळापासून चालत आलेल्या घरगुती औषधांची माहिती कस्तुरीने या लघुपटातून दिली असून आजच्या काळात या औषधांचे असलेले महत्त्वही त्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातून या महोत्सवासाठी २५० लघुपट आले होते. त्यापैकी १६ लघुपटांची निवड महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

२० ते २४ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथे भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखवला जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान प्रसार विभागातर्फे कस्तुरीला या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 88 thousand new electric meters for pune
First published on: 13-02-2018 at 03:08 IST